लॉज, हॉटेलमध्ये राहणाऱ्यांवरही पोलिसांची नजर

By मनीषा म्हात्रे | Updated: May 19, 2025 15:53 IST2025-05-19T15:53:20+5:302025-05-19T15:53:43+5:30

मनीषा म्हात्रे मुंबई : सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत घुसखोरांवर धडक कारवाई सुरू असताना भाड्याने राहणारे तसेच लॉज, छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये ...

Police also keep an eye on those staying in lodges and hotels | लॉज, हॉटेलमध्ये राहणाऱ्यांवरही पोलिसांची नजर

लॉज, हॉटेलमध्ये राहणाऱ्यांवरही पोलिसांची नजर

मनीषा म्हात्रे

मुंबई : सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत घुसखोरांवर धडक कारवाई सुरू असताना भाड्याने राहणारे तसेच लॉज, छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये राहण्यास आलेल्यांची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. दुसरीकडे, मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून पोलिस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. शहरात ओळख दडवून वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची शोधमोहीम पोलिसांनी तीव्र केली आहे.

शहरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या तब्बल २५० बांगलादेशी नागरिकांना गुरुवारी, शुक्रवारी थेट मायदेशी धाडण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिकांना थेट मायदेशी धाडण्याची (प्रत्यार्पण) ही पहिलीच वेळ आहे. भारतात अवैधरित्या घुसलेल्या आणि शहरात ओळख बदलून हात पाय पसरलेल्या परदेशी नागरिकांची शोधमोहीम आधीपासूनच सुरू होती. पहलगाम हल्ल्यानंतर प्राधान्याने परदेशी नागरिकांची शोधाशोध पोलिसांनी सुरू केली आहे.  मुंबईतील संशयितांची माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांचे खबऱ्यांचे जाळेही कार्यरत करण्यात आले आहे तसेच भाड्याने राहणाऱ्यांची माहिती गोळा केली जात असून, वस्त्या, झोपडपट्ट्या पोलिसांकडून पिंजून काढल्या जात आहेत.  

गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी ‘गुप्तवार्ता विभाग’
सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील गोपनीय माहिती गोळा करण्याबरोबर महत्त्वाच्या सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मुंबईत नवीन पोलिस सहआयुक्त पदाची निर्मिती करत त्याची जबाबदारी आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

किनारी भागात गस्तीत वाढ
गेल्या आठवड्याभरात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या मालकांवर दादर, मालवणी, नेहरूनगर, कांदिवली, टिळकनगर, समतानगर, शिवाजी पार्क, जे. जे. मार्ग, विनोबा भावेनगर यांसह वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले आहे तसेच मुसाफिर खाने, हॉटेल, लॉजवर देखील पोलिसांचे विशेष लक्ष आहे.
विमानतळ, महत्त्वाची रेल्वे स्थानके, सागरी मार्गाने मुंबईत शिरण्याच्या प्रत्येक मार्गावर बंदोबस्त तैनात करत परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. सीसीटीव्हीद्वारेही नियंत्रण कक्षातून मुंबई पोलिस लक्ष ठेवून आहेत तसेच मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांत गस्त वाढवली आहे. 

Web Title: Police also keep an eye on those staying in lodges and hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.