कुर्ला पोलिस वसाहतींच्या जागेवर हाेणार पॉड टॅक्सीचे टर्मिनस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:34 IST2025-10-25T10:33:30+5:302025-10-25T10:34:11+5:30
तो वांद्रे आणि कुर्ला या दोन रेल्वे स्टेशनला जोडणार असल्याने एआरटीएस उभारणे आवश्यक आहे.

कुर्ला पोलिस वसाहतींच्या जागेवर हाेणार पॉड टॅक्सीचे टर्मिनस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. कुर्ला परिसरामध्ये ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट स्टेशन (एआरटीएस) उभारण्यासाठी पोलिस क्वार्टरच्या जमिनीचा वापर करण्यात येणार आहे. पोलिस विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा विकास करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) संकुलात विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तो वांद्रे आणि कुर्ला या दोन रेल्वे स्टेशनला जोडणार असल्याने एआरटीएस उभारणे आवश्यक आहे.
दोन्ही स्टेशनजवळ जागा उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणापासून जवळ असलेल्या जागांवर एआरटीएस उभारण्यात येणार आहे. कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ एआरटीएस स्टेशनसाठी जागा उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणाहून जवळच असलेल्या पोलिस वसाहतींच्या ६८०० चौरस मीटरच्या जमिनीचा वापर करण्यात येणार आहे. कुर्ला पोलिस क्वार्टर्समध्ये सध्या १८८ कर्मचारी राहतात.
याठिकाणी सध्या प्रत्येकी १८० चौरस फूट घर आहे. या जागेचा वापर पॉड टॅक्सी टर्मिनससाठी करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) त्यांना प्रत्येकी ४५० चौरस फूट आकाराची एकूण १,०२४ नवीन घरे उपलब्ध करून देणार आहे.
मंजुरी जलदगतीने देण्याचे आवाहन
कुर्लाप्रमाणेच वांद्रे उपनगरीय स्टेशनजवळ एआरटीएस स्टेशन उभारणे शक्य नाही. त्यासाठी स्टेशनपासून जवळच ‘आरएलडीए’ची (रेल्वे भूमी विकास प्राधिकरण) जमीन निश्चित करण्यात आली. ‘आरएलडीए’ने त्यांच्या १० टक्के जमीन (अंदाजे ४००० चौ.मी.) एमएमआरडीएला देण्यास मंजुरी दिली. पॉड टॅक्सी स्टेशन हे वांद्रे स्टेशनजवळ सुरू असलेल्या स्कायवॉकला जोडण्याचा प्रस्ताव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पॉड टॅक्सी प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक मंजुरी जलदगतीने देण्याचे आवाहन एमएमआरडीएने संबंधित विभागांना केले आहे.