पीएमसी बँक अधिकाऱ्यांचा जागाखरेदी गैरव्यवहार उघड, १४.५ कोटींची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:08 IST2025-11-12T10:07:28+5:302025-11-12T10:08:35+5:30
PMC Bank News: पंजाब ॲण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी बँक) अधिकाऱ्यांनी जागा खरेदी गैरव्यवहार करून १४.५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी मेसर्स सुभम कमर्शियल एन्टरप्रायझेस या कंपनीसह तिचे तीन संचालक, व्यवस्थापकीय संचालक आणि तत्कालीन मुख्य व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.

पीएमसी बँक अधिकाऱ्यांचा जागाखरेदी गैरव्यवहार उघड, १४.५ कोटींची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल तपास सुरू
मुंबई - पंजाब ॲण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी बँक) अधिकाऱ्यांनी जागा खरेदी गैरव्यवहार करून १४.५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी मेसर्स सुभम कमर्शियल एन्टरप्रायझेस या कंपनीसह तिचे तीन संचालक, व्यवस्थापकीय संचालक आणि तत्कालीन मुख्य व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीचे संचालक निमित लक्ष्मीचंद छेडा, रुचिक लक्ष्मीचंद छेडा आणि लक्ष्मीचंद दामजी छेडा, बँकेचे तत्कालीन मॅनेजिंग डायरेक्टर जॉय थॉमस आणि तत्कालीन चिफ मॅनेजर कमलजित कौर बनवेत, अशी या गैरव्यवहारातील आरोपींची नावे आहेत. पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.
पीएमसी बँकेने २०१८मध्ये पनवेल येथे नवीन शाखा आणि कार्यालयासाठी सुभम एन्टरप्रायझेसशी जागा खरेदी करार केला होता. या व्यवहारानुसार, बँकेने कंपनीच्या वाशी शाखेत १४.५ कोटी रुपयांपैकी ९.५ कोटी रुपये कराराच्या दिवशी आणि ५ कोटी रुपये एप्रिल २०१८ मध्ये जमा केले. कंपनीने ३० जून २०१८ पर्यंत जागेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ताबा दिला नाही. ताबा न मिळाल्याने बँकेने वारंवार पाठपुरावा करून रक्कम परत मागितली. मात्र, कंपनीने प्रतिसाद दिला नाही.
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या अधिकाऱ्यांनी २०२४ मध्ये जागेची पाहणी केल्यावर बांधकाम अपूर्ण आणि बंद असल्याचे आढळले. चौकशीत, हा व्यवहार करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेन्ट्रल रजिस्ट्रारची परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बँकेचे तत्कालीन एमडी थॉमस आणि चिफ मॅनेजर कमलजित कौर यांनी नियम मोडून कंपनीला आर्थिक लाभ दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार यांनी तक्रार दिल्यानंतर भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरण उघडकीस कसे आले?
पीएमसी बँक आणि हाउसिंग डेव्हलपमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) या कंपनीचा घोटाळा २०१९ मध्ये उघडकीस आल्याने आरबीआयने पीएमसी ही बँक भारत सरकारच्या गॅझेट अन्वये युनिटी स्मॉल फायनान्स बँकमध्ये समाविष्ट केली.
त्यानंतर ‘युनिटी स्मॉल’ने पीएमसी बँकेचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. ‘युनिटी स्मॉल’च्या प्रशासकीय पथकाला पीएमसी बँकेने २०१८ मध्ये मेसर्स सुभमशी जागा खरेदीसंदर्भात केलेल्या कराराबाबतची कागदपत्रे सापडली. त्यातून हा गैरव्यवहार उघडकीस आला.