Join us

"राममंदिर भूमिपूजनच्या ऐतिहासिक दिवशी नरेंद्र मोदींनी शिवछत्रपतींचा केलेला उल्लेख हा महाराष्ट्राचा सन्मान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 10:13 IST

नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख केल्यानं भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावर भावना व्यक्त केली आहे.

मुंबई:  राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले, यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेचा उल्लेख केला होता. 'ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यात निमित्त झाले, त्याचप्रमाणे देशातील सर्व जनतेच्या सहकार्यानं राम मंदिराच्या पुनर्निमाणाचे पुण्य कार्य होऊ घातले आहे,' असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख केल्यानं भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावर भावना व्यक्त केली आहे.

प्रभू श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर भूमिपूजन ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवछत्रपतींचा व मावळ्यांचा केलेला उल्लेख तमाम देशवासियांसमोर केलेला आपल्या महाराष्ट्राचा सन्मान व गौरव आहे, अशी भावना उदयनराजे भोसले ट्विट करत व्यक्त केली आहे.

राम मंदिराचे विधीवत भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले होते. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, माझे येथे येणे स्वाभाविकच होते. आज इतिहास रचला जात आहे. कन्या कुमारीपासून क्षीर भवानिपर्यंत, सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत, आणि लक्ष्यद्विपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय आहे. एवढेच नाही, तर "राम काज कीन्हे बिनु मोहि कहां विश्राम", असे म्हणत, शतकांची प्रतीक्षा आज संपत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे. अनेक वर्षे रामलला टेंटमध्ये होते. मात्र, आता भव्य मंदिर उभारले जात आहे, असं नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं होतं.

अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा दूरचित्रवाणीवरून अमेरिका, ब्रिटनसह जगभरात मोठ्या भक्तिभावाने पाहिला गेला. एवढेच नाही, तर जगभरातील भारतीय समुदायाने घरोघरी सजावट करून पूजा, आरती केली. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, थायलँड, नेपाळसह जगातील अनेक देशांत दिवे लावून हा सोहळा दिवाळीसारखाच साजरा केला. भारतासोबत अवघे जग ‘जय श्रीराम’ या जयघोषाने राममय झाले होते.

टॅग्स :राम मंदिरअयोध्याछत्रपती शिवाजी महाराजनरेंद्र मोदीउदयनराजे भोसले