Join us

पंतप्रधान नरेंद्र मोदी चाखणार कोकणचा आंबा; दिल्लीत भरणार अस्सल हापूस आंबा महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:51 IST

राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदार यांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याचे खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितले.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - दिल्लीकरांना लवकर अस्सल देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. शहरातील उत्तर पश्चिम मतदारसंघाचे शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेने दिल्लीत आंबा महोत्सव साजरा होणार आहे. या आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास उपस्थित राहण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्त्वता मान्यता दिली आहे. ही संकल्पना मोदींना आवडल्यामुळे त्यांनी या महोत्सवाला येण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती खासदार वायकरांनी दिली.

दिल्लीतील आंबा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावे यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंतप्रधानांना आंबा महोत्सवाला येण्याचं अधिकृत निमंत्रण दिले. या बैठकीत पंतप्रधानांनी प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे असं मत व्यक्त केलं. कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकऱ्यांना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी यासाठी आंबा महोत्सवाचं दिल्लीत आयोजन केले आहे. 

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये ३० एप्रिल ते १ मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदार यांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याचे खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधानांसोबतच्या या भेटीत वायकरांनी शहरातील पाणी प्रश्नाबाबतही लक्ष वेधले. मुंबईतील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन गारगाई-पिंजाळ प्रकल्प पूर्ण करण्यात यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तसेच एम्सच्या धर्तीवर मुंबईत एक रुग्णालय सुरू करण्यात यावे यामध्ये कॅन्सर रुग्णांवर उपचाराची सुविधा करण्यात यावी अशी विनंती खासदार वायकर यांनी पंतप्रधानांकडे केली. 

टॅग्स :आंबानरेंद्र मोदी