लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : 'लोकमत'च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सार्वजनिक संवादाला आकार देण्यात आपण मोलाची भूमिका बजावत आला आहात. शिक्षण आणि समाजकार्यातले आपले अखंड योगदान प्रेरणादायी आहे. राज्यसभेचे सदस्य म्हणूनही आपण आपल्या सामाजिक बांधिलकीचा चोख प्रत्यय दिला आहे. आपल्या या प्रवासातला अमृतमहोत्सवाचा टप्पा शुभंकर असो' अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्यासाठी पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. 'जीवनाच्या या टप्प्यावर थोडे थांबावे, ज्यावर हिंमतीने मात केली त्या आव्हानांची-संघर्षाची आठवण काढून त्यातून नवी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या जीवनमूल्यांशी बांधिलकीची शपथ पुनश्च पक्की करावी' असेही पंतप्रधान आपल्या व्यक्तिगत पत्रात म्हणतात.
महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात सातत्याने अग्रेसर असणारे आणि विविध माध्यमांमधून राष्ट्रीय स्तरावर सतत कार्यरत असणारे विजय दर्डा आज (दि १४ मे) अमृतमहोत्सव साजरा करत आहेत. राजकीय मत-पक्ष भिन्नता ओलांडून सर्वपक्षीय वर्तुळात आपल्या दिलदारीसाठी ओळखले जाणारे दर्डा मैत्री आणि स्नेह ही जीवनमूल्ये नेहमीच सर्वश्रेष्ठ मानत आले आहेत. सर्वोच्च सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले राजकीय नेते, ख्यातकीर्त उद्योगपती, मनोरंजन-माध्यम विश्वातल्या मान्यवरांबरोबरच दीर्घकालीन सहकारी आणि जुन्या मित्रगणांसह आप्तांच्या गोतावळ्यातून विजय दर्डा यांच्यासाठी आशीर्वचने आणि शुभेच्छांचा ओघ सतत सुरु आहे.
सर्वश्री अमित शाह, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, अजित पवार, पीयूष गोयल, अरविंद केजरीवाल, प्रमोद सावंत, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रफुल पटेल, कमलनाथ, बनवारीलाल पुरोहित, गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंग, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, शशी थरूर, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक नेत्यांनी शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. ख्यातनाम उद्योगपती मुकेश-नीता अंबानी, गौतम अदानी, कुमारमंगलम बिर्ला, सुनील मित्तल, संजीव बजाज, अनिल अग्रवाल, सज्जन जिंदल, गौतम सिंघानिया, प्रकाश हिंदुजा, अभय फिरोदिया, हर्ष गोयंका, संतसिंह चटवाल यांनी विजय दर्डा यांचे अभिष्टचिंतन केले आहे.
अमिताभ बच्चन, आमीर खान, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह मनोरंजन विश्वातील तारे तसेच मामेन मॅथ्यू, शोभना भारतीय आणि विवेक गोयंका यांच्यासह माध्यम विश्वातील मान्यवर.. ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. एस, बी. मुजुमदार, श्री श्री रविशंकर, सदगुरु, बाबा रामदेव, आचार्य लोकेश मुनी, प्रीतिसुधाजी महाराज साहेब आणि जैन धर्मातील मान्यवर गुरुजनांनीही दर्डा यांच्यासाठी आवर्जून शुभेच्छा संदेश पाठवले आहेत.