Join us  

मोदी-बोरिस जॉन्सन चर्चेमुळे आर्थिक, शैक्षणिक देवाण-घेवाणीला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 5:26 AM

आर्थिक, औद्योगिक, आरोग्य, शैक्षणिक या क्षेत्रात भारत व ब्रिटनमधील देवाण-घेवाण वाढविण्यासाठी पावले टाकली जात आहे.

दिनकर रायकर, लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : आर्थिक, औद्योगिक, आरोग्य, शैक्षणिक या क्षेत्रात भारत व ब्रिटनमधील देवाण-घेवाण वाढविण्यासाठी पावले टाकली जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यातील चर्चेने त्यास वेग आला आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन व आमच्या वित्त अधिकाऱ्यांचीही बैठक झाली. त्यानंतर यासंदर्भात आम्ही पाठपुरावा सुरू केला आहे, असे ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त ॲलेक्स एलिस यांनी ‘लोकमत’ला विशेष मुलाखतीत सांगितले.

ॲलेक्स एलिस मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. ते म्हणाले की, टाटा, महिंद्रा यांनी ब्रिटनमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती केली आहे. ब्रिटनच्या विमा कंपन्याही भारतामध्ये येण्यास, व्यवसाय करण्यास उत्सुक आहेत. त्यादृष्टीने बोलणी सुरू आहेत. ते म्हणाले की, ब्रिटनमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारा भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदलामुळे उद्योगांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सोडविण्यासाठी अनुरूप कायदे आवश्यक असून, तो विचार सीतारामन यांच्याशी चर्चेत झाला.

त्यांनी सांगितले की, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात देवाण-घेवाण वाढावी, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच यंदा ब्रिटनने भारताला १३ टक्के अधिक स्टुडंट व्हिसा जारी केले. ब्रिटनमधील विद्यार्थीही भारतात मोठ्या संख्येने शिकायला येणार आहेत. ही प्रक्रिया सुरूच राहील. एलिस म्हणाले की, अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीमुळे भारतासह अन्य देशांत दहशतवादी कारवाया वाढू नयेत यासाठी ब्रिटन दक्ष आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा व विकासात ब्रिटनने मोठे योगदान आहे. मात्र, तेथील आमच्या दूतावासात आमचे कर्मचारी नाहीत. सैन्यही माघारी आले आहेत. त्या देशात ब्रिटनचे ४५७ सैनिक मरण पावले, शेकडो सैनिक जखमी झाले. यादवीमुळे तेथील सुमारे २० हजार नागरिक ब्रिटनच्या आश्रयाला आले आहेत. त्यात मुली, महिला, लहान मुलेही आहेत. त्यांच्यासाठी ब्रिटन योजना आणत आहे.

तालिबानी राजवटीस पाकिस्तान, रशिया, चीनने मान्यता दिली आहे. भारताची दोहामधील तालिबानीशी बोलणी अयशस्वी ठरली. ब्रिटनच्या भूमिकेबाबत एलिस म्हणाले की, तालिबानशी आमची बोलणी सुरू आहेत. त्यासाठी विशेष प्रतिनिधी नेमला आहे. चर्चा सुरूच राहील. अफगाणिस्तानबाबत आम्ही रशिया, ताजिकिस्तान, पाकिस्तान यांच्याशी चर्चा करीत आहोत. त्यामध्ये कशी प्रगती होते यावर पुढचे सारे अवलंबून आहे.

क्रिकेटमध्ये भारत प्रबळ

क्रिकेटविषयी ते म्हणाले की, दोन्ही देशांतील चारही सामने रंगतदार झाले. क्रिकेटमध्ये भारत प्रबळ आहे. त्यामुळे ब्रिटनचे अनेक खेळाडू भारतात आयपीएल क्रिकेट संघांतून खेळतात.

भारताला सहकार्य

- ॲलेक्स एलिस म्हणाले की, जिनोमिक टेस्ट तंत्रज्ञानाबाबत ब्रिटन भारताला सहकार्य करत आहे. कोरोना विषाणूंचे ज्या पद्धतीने उत्परिवर्तन होत आहे, त्याचा नीट मागोवा घेणे या तंत्रज्ञानामुळे शक्य होईल. 

- संरक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध प्रस्थापित झाले आहेत. हिंद महासागराच्या पश्चिम भागात सुरक्षेच्या दृष्टीने ब्रिटन भारताला सहकार्य करत आहे.

थरूर यांची भाषा आलंकारिक 

- भारतावर ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज्य केले. आमची संपत्ती लुटून नेली. त्याबद्दल ब्रिटनने भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील कार्यक्रमात केली होती.

- त्यावर एलिस म्हणाले की, थरूर यांची भाषा आलंकारिक आहे. आम्हाला प्रिय आहे. ते भूतकाळातील घटनेविषयी बोलले आहेत. ब्रिटन व भारतामध्ये भविष्यात तशा घटना घडणार नाहीत, हे नक्की.  व्यापार संबंध वाढविणे हा त्यावर उपाय आहे. 

टॅग्स :मुंबईभारतपंतप्रधाननरेंद्र मोदीबोरिस जॉन्सनइंग्लंड