Join us  

PM केअर फंडात 2 लाख 51 हजार दिले, पण मरणाच्या दारातील माझ्या आईला बेड नाही मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 8:40 AM

विजय पारेख यांनी पीएम केअर फंडात तब्बल 2 लाख 51 हजार रुपये जमा केले होते. देशावरील कोरोनच्या संकटात त्यांनी आपल्यापरीने पीएम केअर फंडासाठी हा मोठा निधी दिला.

ठळक मुद्देमी पीएम केअर फंडात 2.51 लाख रुपयांची रक्कम जमा केली, पण मरणाच्या दारावर असलेल्या माझ्या आईला बेड उपलब्ध झाला नाही.

मुंबई - कोरोनाची पहिली लाट आली अन् देशात पहिल्यांदाचा लॉकडाऊनची घोषणा झाली. कधी नव्हे ते देशाने महिनों-महिने लॉकडाऊन अनुभवला. या अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे गरीब अन् कामगारवर्गाचे मोठे हाल झाले. मजूरांची, स्थलांतरांची पायपीट झाली. या भावनिकतेतच देशावरील संकटासाठी मदतीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. अब्जावधी रुपये पीएम केअर्स फंडात जमा झाले. अहमदाबादच्या विजय पारेख यांनीही या फंडात मोठी रक्कम जमा केली होती.  

विजय पारेख यांनी पीएम केअर फंडात तब्बल 2 लाख 51 हजार रुपये जमा केले होते. देशावरील कोरोनच्या संकटात त्यांनी आपल्यापरीने पीएम केअर फंडासाठी हा मोठा निधी दिला. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांच्या आजारी असलेल्या आईल, उपचारासाठी भटंकती करणाऱ्या मातेला रुग्णालयात बेडही मिळाला नाही. त्यामुळे, विजय पारेख यांनी आपली शोकांतिका ट्विटर अकाऊंवरुन मांडली आहे. तसेच, त्यांनी 10 जुलै 2020 रोजी ही रक्कम जमा केल्याची पावतीही ट्विटरवरुन शेअर केली आहे.  मी पीएम केअर फंडात 2.51 लाख रुपयांची रक्कम जमा केली, पण मरणाच्या दारावर असलेल्या माझ्या आईला बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे, मल्ला मार्गदर्शन करा की, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मी कुठे मदत करु, ज्यामुळे मला बेड मिळेल आणि मी कुणाला गमावणार नाही, असे भावनिक ट्विट पारेख यांनी केलंय. पारेख यांचं हे ट्विट चांगलच व्हायरल होत आहे. केवळ 12 तासांत 14 हजार लाईक आणि 6,200 रिट्विट झाले आहेत. विशेष म्हणजे पारेख यांचे यापूर्वीचे ट्विट पाहिल्यास ते भाजपा समर्थक असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शन मिळविण्यासाठी मोठा संघर्ष नातेवाईकांना करावा लागला आहे. रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं. तर, मृत्यूदरही चांगलाचा वाढल्याचं दिसून आलं. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसअहमदनगरहॉस्पिटलनरेंद्र मोदी