Join us

कृपया पर्यावरणपूरक फटाके फोडा; आयुक्तांचे पुन्हा आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 09:50 IST

महापालिकेला धसका मुंबईकरांच्या ‘धमाक्यांचा’

मुंबई : न्यायालयाने आदेश देऊनही लक्षमी पूजनाच्या दिवशी मुंबईकरांनी केलेल्या फटाक्यांच्या धमाक्यांचा मुंबई महापालिकेने चांगलाच धसका घेतला असून, प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी आयुक्तांनी पुन्हा मुंबईकरांना आवाहन केले आहे. पर्यावरणपूरक आणि कमी वायू उत्सर्जन करणारे फटाके निवडा किंवा वायू प्रदूषणात भर टाकणार नाहीत, असे उत्सवाचे पर्याय शोधा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी केले आहे. फटाके फोडण्यासाठी रात्री आठ ते दहा यावेळेची आठवणही त्यांनी करून दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषण कमालीचे वाढले असून, दिल्लीच्या दिशेने मुंबईची वाटचाल सुरू आहे. हा धोका ओळखून महापालिका सतर्क झाली असून, प्रदूषण रोखण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. प्रदूषणाचे गांभीर्य  लक्षात आल्याने मुंबईकर यंदा कमी आतषबाजी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईकरांनी जोरदार आतषबाजी केली. शिवाय रात्री दहा वाजल्यानंतरही फटाके फोडले.  एका दिवसात प्रदूषणाची पातळी वाढली असण्याची शक्यता आहे.

वायुप्रदूषण न करता दिवाळी साजरी करु!

दिवाळी हा पारंपरिक सण आहे जो आपल्या घरांना दिव्यांच्या प्रकाशाने आणि रंगीबेरंगी सजावटीने प्रकाशित करतो. फटाक्यांचा धूर व आवाजापेक्षा दिव्यांच्या प्रकाशावर भर देऊन दिवाळीचा खरा आनंद स्वीकारूया. आपण आपल्या सभोवतालच्या परिसराची जाणीव ठेवूया. शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, पेट्रोल पंप आणि रस्त्यावर निषिद्ध अशा क्षेत्रांमध्ये फटाके न फोडण्याचा निश्चय करूया. सर्वांसाठी शांततापूर्ण उत्सव सुनिश्चित करूया, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :फटाकेदिवाळी 2023