Join us
Daily Top 2Weekly Top 5

Plastic Ban : रामदास कदमांनी नात्यांमध्ये वाद निर्माण करू नये - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 15:49 IST

रामदास कदमांनी नात्यांमध्ये वाद निर्माण करु नये, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. 

ठळक मुद्देरामदास कदम यांनी नात्यावर बोलू नयेप्लॅस्टिकबंदीवरुन राज्य सरकारवर हल्लाबोल सरकारच्या नाकर्तेपणाचा दंड जनतेला कशासाठी?

मुंबई :  सोमवारी प्लॅस्टिकबंदीवरुन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरेंना पुतण्याची इतकी भीती वाटू लागली का? असा सवाल करत एक मुलगा चांगला निर्णय घेतोय (आदित्य) त्याचे कौतुक करा. उगाच विरोध का करताय, असा टोला लगावला होता. यावर प्रत्युत्तर देताना रामदास कदमांनी नात्यांमध्ये वाद निर्माण करु नये, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. 

राज ठाकरे म्हणाले, हा माणूस इवलीशी बुद्धी असणारा आहे. मुळात सांगकाम्यांना यामधील काही कळणार नाही. माझा प्रश्न हा सरकारशी संबंधित आहे. नात्यांशी नाही. कदमांनी नात्यांमध्ये वाद निर्माण करू नये. प्लास्टिक बंदीचा निर्यण त्यांनी घेतला तर त्यावर बोलावे. निर्णय सरकारने घेतला, त्यामुळे सरकारने त्यावर बोलावे. विनाकारण दुसरीकडे विषय नेऊ नये, अशी टीका त्यांनी रामदास कदम यांच्यावर केली. 

याचबरोबर, प्लॅस्टिकबंदीवरुन राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला. ते म्हणाले, एखाद्याला आलेला झटका, हे देशाचं किंवा राज्याचे धोरण ठरू शकत नाही. कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता प्लास्टिकबंदी करून नागरिकांकडून दंड आकारणे साफ चुकीचे आहे. सरकारच्या नाकर्तेपणाचा दंड जनतेला कशासाठी? असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला.

काय म्हणाले होते रामदास कदम?प्लॅस्टिक बंदीचा निर्णय हा नोटाबंदीप्रमाणे अचानक घेतलेला नाही. हा निर्णय सहा महिन्यांपूर्वीच घेण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने तीन महिन्यांची अतिरिक्त मुदत दिली होती. याकाळात प्लॅस्टिक बंदीबाबत जाहिराती, प्रबोधन केले. मात्र राजकीय पुढा-यांना याची कल्पना नसेल तर तो त्यांचा दोष आहे.. चांगल्या निर्णयाला विरोधाची भूमिका निषेधार्ह आहे." विरोधकांनी प्लॅस्टिकला पर्याय आणि दंडाच्या रकमेबाबत पत्रकबाजी केली. मातोश्रीवर बॅनरबाजी करण्यात आली. राज ठाकरेंना पुतण्याची इतकी भीती वाटू लागली का?  राज ठाकरे बहुधा कधी बाजारात गेले नसावेत. त्यामुळे कशावर व कधीपासून बंदी याची कल्पना नसावी. एक मुलगा चांगला निर्णय घेतोय (आदित्य) त्याचे कौतुक करा. उगाच विरोध का करताय. असा टोलाही त्यांनी लगावला होता.

काय म्हणाले राज ठाकरे ?- बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठेंवरील कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात- निर्णय सरकारने घेतला, उत्तर सरकारने द्यावं, रामदास कदमांनी नात्यावर भाष्य करू नये - निर्णय सरकारनं घेतलाय, त्यामुळे सरकारनंच उत्तर द्यावं- स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली निव्वळ कर आकारणी- इतर अनधिकृत गोष्टींवर कारवाई करण्यासाठी का धजावत नाही?- नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्यांचीही व्यवस्था नाही -  जोपर्यंत सर्व सुविधा मिळत नाही, तोपर्यंत दंड देऊ नका- दंड आकारायला माझा विरोध आहे- महापालिका प्रशासनानं आणि सरकारनं स्वतःचं काम नीट करावं- मुख्यमंत्र्यांनी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयात तातडीनं लक्ष घातलं पाहिजे- महापालिका आधी स्वतःची जबाबदारी पार पाडतेय का ?- प्लॅस्टिक बंदीमागे राजकीय फंडाचं गणित तपासून पाहिलं पाहिजे- कचरा टाकायला कचराकुंड्या पाहिजेत- एखाद्याला आलेला अचानक झटका म्हणजे धोरण नव्हे- सरकारनं प्लॅस्टिकबंदीवरची कारवाई थांबवावी- प्लॅस्टिक बंदी करताना इतर पर्याय तुम्ही आणलात का? - सरकारनं स्वतःची काम नीट करावी आणि मगच लोकांना उपदेश करावेत- प्लॅस्टिक बनवणा-या कंपन्यांकडून फंड मागितला गेला- हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा की एका खात्याचा- नाशिकमध्ये मनसेनं कच-यापासून खत प्रकल्प तयार केले- बंदी असेल तर सर्व प्लॅस्टिक बंद करावं- तुमचं संपूर्ण आयुष्य प्लॅस्टिकनं गुंडाळलेले आहे- प्लॅस्टिकबंदीची एवढी  घाई कशाला ?- व्हॉट्सअॅपवर फिरणारे मेसेज ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही

टॅग्स :राज ठाकरेमुंबईरामदास कदमआदित्य ठाकरेमनसेप्लॅस्टिक बंदी