जाहिराती सुपरहिट करणारे पीयूष पांडे यांचे निधन; लोकप्रिय घोषवाक्यांचे बादशाह होते ॲडगुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 08:05 IST2025-10-25T08:05:14+5:302025-10-25T08:05:36+5:30
शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार हाेतील.

जाहिराती सुपरहिट करणारे पीयूष पांडे यांचे निधन; लोकप्रिय घोषवाक्यांचे बादशाह होते ॲडगुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘हमारा बजाज’, ‘कुछ खास है जिंदगी में’, ‘अबकी बार मोदी सरकार’, ‘ठंडा मतलब कोका कोला’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय घोषवाक्यांच्या बळावर जाहिराती सुपरहिट करणारे ॲडगुरू पद्मश्री पीयूष पांडे (७०) यांचे गुरुवारी निधन झाले. ते गंभीर संसर्गाने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात बंधू दिग्दर्शक प्रसून पांडे, बहीण गायिका-अभिनेत्री इला अरुण व इतर परिवार आहे. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार हाेतील.
दि. ५ सप्टेंबर १९५५ रोजी राजस्थानमधील जयपूरमध्ये जन्मलेल्या पीयूष यांना सात बहिणी आणि दोन भाऊ आहेत. जयपूरमधील सेंट झेव्हिअर्स स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. दिल्लीतील स्टीफन्स काॅलेजमध्ये इतिहास विषय घेऊन त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यांनी वयाच्या २७ व्या वर्षी जाहिरात क्षेत्रात प्रवेश केला. बंधू प्रसून यांच्यासोबत कारकीर्द सुरू करत त्यांच्यासोबत त्यांनी दैनंदिन उत्पादनांसाठी रेडिओ जिंगल्सची कामे केली. १९८२ मध्ये त्यांनी ‘ओगिल्वी’ या जाहिरात कंपनीत एन्ट्री केली. १९९४ मध्ये त्यांची ओगिल्वीच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली. २०१६ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०२४ मध्ये त्यांना एलआयए लिजेंड अवॉर्डही मिळाला. कान लायन्स फेस्टिव्हलचे आशियातील ते पहिले ज्युरी प्रेसिडेंट बनले होते.
जॉन अब्राहम आणि नर्गिस फाखरी यांच्या ‘मद्रास कॅफे’ चित्रपटात पांडे कॅबिनेट सेक्रेटरीच्या रूपात झळकले होते. भोपाळ एक्सप्रेस चित्रपटासाठी त्यांनी पटकथा सह-लेखन केले. त्यांनी ‘पांडेमोनियम’ आणि ‘ओपन हाऊस विथ पियुष पांडे’ या पुस्तकांचे लेखन केले होते.
पांडे यांनी बनविलेल्या फेव्हिकाॅलची ‘जोड तोड नहीं सकता’, एशियन पेंट्सची ‘हर घर कुछ कहता है’, कॅडबरी डेअरी मिल्कची ‘कुछ खास है जिंदगी में!’ आणि पोलिओची ‘दो बुंद जिंदगी की’ या जाहिरातींनी जनमानसाच्या मनात घर केले.