Join us  

पियुष गोयलजी, महाराष्ट्र बेस्ट होता, बेस्ट आहे आणि 'बेस्टच राहणार' !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 9:42 AM

प्रजासत्ताक दिन हा देशाचा उत्सव असून, केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे

मुंबई - राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने पियुष गोयल यांना लक्ष करत, महाराष्ट्र बेस्ट होता, बेस्ट आहे आणि बेस्ट राहणार, असे म्हटले आहे.  

प्रजासत्ताक दिन हा देशाचा उत्सव असून, केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु केंद्र सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यानंतर, मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. त्यामुळे भाजपाने पुढे याबाबत भूमिका स्पष्ट करत, या निवडीसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. मात्र, चित्ररथाला नाकारणं हे नियमाच्या अनुषंगाने झालेलं आहे. हरियाणाचा चित्ररथही नाकारला गेला आहे. जे बेस्ट आहेत, त्यांना संधी दिली गेली आहे, असं पियुष गोयल म्हणाल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं होतं. गोयल यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने फेसबुक पोस्ट लिहून गोयल यांना विस्मरणाचा रोग झाल्याचं म्हटलंय. तसेच महाराष्ट बेस्ट होता, बेस्ट आहे आणि बेस्ट राहणार.. असेही राष्ट्रवादीने म्हटलंय. 

राष्ट्रवादीची फेसबुक पोस्ट : 

''यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारून आधीच महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यात 'जे बेस्ट आहेत, त्यांना संधी दिली गेली आहे' असं वक्तव्य केंद्रीय वाणिज्य-उद्योग मंत्री पियुष गोयल Piyush Goyal यांनी केल्याची बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे. गोयल यांचे हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या स्मरणात थोडीशी भर घालणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला आतापर्यंत सहा वेळा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. १९८० मध्ये 'शिवराज्याभिषेक', १९८३ मध्ये बैलपोळा हे महाराष्ट्राचे चित्ररथ जिंकले, १९९३, १९९४ आणि १९९५ अशी तीन सलग वर्षे महाराष्ट्राने पुरस्कार पटकावला, तर २०१८ मध्येही महाराष्ट्राचा चित्ररथ संचलनात अव्वल ठरला होता, याचे विस्मरण त्यांना झालेले दिसते. त्यामुळे पियुष गोयलजी महाराष्ट्र बेस्ट होता, बेस्ट आहे, आणि बेस्ट राहणार!

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्रसुप्रिया सुळेपीयुष गोयल