लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालवणी परिसरात पिस्तूल खोचून फिरत दहशत पसरविणाऱ्या आरिफ शहा (३५) याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार काडतुसेही हस्तगत केली आहेत.
मालवणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे, अंमलदार अनिल पाटील, जगदीश घोसाळकर, शिपाई सुशांत पाटील, सचिन वळतकर, मुद्दशीर देसाई, समित सोरटे व कालिदास खुडे हे शुक्रवारी गस्त घालत होते. त्यादरम्यान म. वा. देसाई मैदानाजवळील फुटपाथवर एक व्यक्ती पॅन्टच्या मागच्या बाजूला पिस्तूल खोचून फिरत असल्याची माहिती डॉ. हिंडे यांना मिळाली. पोलिस उपायुक्त संदीप जाधव आणि मालवणीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, निरीक्षक जीवन भातुकले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हिंडे यांनी रात्री त्याला ताब्यात घेतले.
गोवा येथून शस्त्र आणल्याची कबुली शहा याच्या अंगझडतीत सिल्वर आणि काळ्या रंगाच्या धातूचे भारतीय बनावटीचे पिस्तूल तसेच चार काडतुसे सापडली. त्याची किंमत अंदाजे ७९ हजार रुपये असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. शहा हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचा रहिवासी आहे. तसेच ही पिस्तूल त्याने गोव्यातून आणल्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचे अन्य कोणी साथीदार यात सामील आहेत का, याचा तपास डॉ. हिंडे यांचे पथक करत आहे.