मुंबई : कबुतरखान्यांचा तिढा काही सुटण्यास तयार नाही. असे असताना कबुतरांना दाणे टाकण्याचे उद्योग सुरूच आहेत. माहीममधील एल. जे. मार्ग डॉमिनिक पिझ्झाजवळ कबुतरांना खाद्य टाकल्याबद्दल अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला असून, मुंबईत या प्रकरणातील पहिलीच कारवाई आहे.नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत असल्यामुळे कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने कबुतरखाने बंद करण्यास हालचाली सुरू करून दादरच्या कबुतरखान्यातील बांधकाम काढून टाकले. तसेच तेथून जवळपास ५० किलो धान्य जप्त करण्यात आले होते. दादरप्रमाणेच मुंबईतील अन्य कबुतरखान्यांवरही कारवाई करण्यास सुरुवात झाली होती.
फोर्ट परिसरातील जीपीओ भागातील कबुतरखान्याच्या ठिकाणी कारंजे उभारण्याचा पर्याय पालिकेपुढे होता; परंतु कबुतरखान्याच्या बांधकामावर कार्यभाव करू नये, असे निर्देश दिल्यामुळे कारवाई थंडावली. मात्र, त्याच वेळेस कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने कारवाई सुरू केली आहे.
दादरमधील तिढा सोडवायचा कसा? अनेक ठिकाणी अजूनही लोक कबुतरांना खाद्य देत असल्याचे आढळून आले आहे. खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यामुळे पालिकेच्या कारवाईला बळ मिळणार आहे. गुन्हे दाखल होऊ लागले तरच कबुतरांना खाद्य टाकणे बंद होईल, अशी पालिकेला अपेक्षा आहे. दुसरीकडे दादरमधील कबुतरखान्यावर जाळी बसविण्यास मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी मजाव केला. त्यामुळे कबुतरखान्यांचा तिढा सोडवायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘बेकायदा संप; गुन्हा दाखल करा’ लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील ठेकेदाराच्या ठेका कर्मचाऱ्यांच्या कामगार संघटनेने शुक्रवारी अचानक बंद करून नागरिक आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरले. या प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना फोन करून संप पुकारणाऱ्या संघटनांवर बंदी घालून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेने आता भाजपप्रणित कामगार संघटना पदाधिकाऱ्यांसह आंदोलनात सहभागी झालेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे.