कबुतर दाणे खाण्यात मग्न, राजकारणी भांडणात व्यस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:41 IST2025-08-07T10:40:59+5:302025-08-07T10:41:32+5:30
बुधवारी सकाळी जैन समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी दादरच्या कबुतरखान्यावर महापालिकेले बांधलेले प्लास्टिक कापड काढून कबुतरांसाठी मार्ग मोकळा केला.

कबुतर दाणे खाण्यात मग्न, राजकारणी भांडणात व्यस्त
मुंबई : दादर कबुतरखान्यावर महापालिकेने टाकलेले प्लास्टिक छप्पर जैन समाजाच्या स्वयंसेवकांनी काढून टाकल्याच्या मुद्द्यावरून मुंबईत आता राजकारण तापले. कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कबुतरखान्याजवळ आक्रमक झालेले लोक बाहेरचे होते, असा आरोप केला, तर विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्याला प्रत्युत्तर देताना ‘बाहेरचे म्हणजे कुठून आले होते ?’ असा सवाल केला.
बुधवारी सकाळी जैन समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी दादरच्या कबुतरखान्यावर महापालिकेले बांधलेले प्लास्टिक कापड काढून कबुतरांसाठी मार्ग मोकळा केला. यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि जवळच असलेल्या श्री आगरतड श्री शांतीनाथजी महाराज जैन देरासर ट्रस्टला भेट दिली.
लोढा यांनी आंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. ‘कबुतरखान्याजवळील आंदोलन चुकीचे होते. मी अधिकारी आणि जैन मंदिर ट्रस्टींशी बोललो. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘आंदोलनकर्ते स्थानिक नव्हते, बाहेरचे होते,’ असे लोढा यांनी सांगितले.
कबुतरांच्या विष्ठेचा त्रास जात-धर्म पाहून होत नाही. याप्रकरणी राजकारण न करता तोडगा काढावा, असे मत भाजप आ. चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.
कबुतरांच्या विष्ठेतील फंगसमुळे लोक मृत्युमुखी पडत आहेत, याला जबाबदार कोण? जे या आजारपणामुळे दगावले, त्यांच्याबद्दल काय, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेच्या प्रवक्त्या आ. मनीषा कायंदे यांनी दिली.
आ. रोहित पवार तसेच उद्धवसेनेचे आ. महेश सावंत यांनीही कबुतरखान्याला भेट देत जैन मंदिर ट्रस्टींशी चर्चा केली. रोहित पवार यांनी लोढा यांच्यावर टीका करत त्यांचे म्हणणे खोडून काढले. ‘मुंबईतील सगळ्याच जैन समाजाचा कबुतरखाना बंदीला विरोध आहे. या ठिकाणी लोक आले असतील तर ते बाहेरचे कसे? असा सवाल पवार यांनी केला.
महापालिकेला दोषी ठरवत महापालिकेने प्लास्टिक छप्पर टाकल्याने कबुतरे रस्त्यावर येऊ लागली आणि अपघातात दगावली, असा दावा सावंत यांनी केला.
‘लोकभावना व आरोग्याची सांगड घालावी लागेल’
एकीकडे आस्था व लोकभावना आहे तर दुसरीकडे लोकांचे आरोग्य देखील आहे. याची सांगड घालावी लागेल. लोकभावना व धार्मिक भावना जपण्यासाठी काय करता येईल? आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, असा सरकारचा प्रयत्न असून यावर मार्ग काढण्यासाठी काही मार्ग सुचले आहेत. ते न्यायालयासमोर मांडणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.