कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 06:28 IST2025-08-12T06:28:23+5:302025-08-12T06:28:34+5:30

फुप्फुसतज्ज्ञ डॉ. सुजीत राजन यांचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Pigeon droppings cause serious lung diseases in children Pulmonologist Dr Sujit Rajan affidavit in the Bombay High Court | कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत

कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत

मुंबई : कबुतरांच्या विष्ठेच्या सातत्याने संपर्कात राहणे हे फुप्फुसांच्या आरोग्यास हानिकारक आहे. यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये फायब्रोटिक हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस (फुफ्फुसाचे गंभीर आजार) आढळून आल्याचे प्रतिज्ञापत्र वरिष्ठ फुप्फुसतज्ज्ञ डॉ. सुजीत राजन यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईउच्च न्यायालयात दाखल केले आहे.

मुंबई महापालिकेने कबुतरांच्या धोक्याबद्दल एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यावर विचार करून डॉ. राजन यांनी १० दिवसांत आपले मत मांडावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. २०१८ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरही डॉ. राजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. डॉ. राजन यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही कबुतरांच्या थव्यांमुळे आरोग्यास कसा धोका आहे, हे स्पष्ट केले आहे.

डॉ. राजन यांच्या प्रतिज्ञापत्रातील मुद्दे

२०१८ मध्ये उच्च न्यायालयात मांडलेली भूमिका पुन्हा अधोरेखित करतो. कबुतरांना खाद्य देणे अतिधोकादायक आहे. इतकेच नव्हे तर कबुतरांच्या विष्ठेच्या सातत्याने संपर्कात आल्यास फुप्फुसांना हानी पोहोचते.

२०१८ मध्ये किशोरवयीन मुलांमध्ये फायब्रोटिक हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस आढळला होता. दुर्दैवाने गेल्या काही वर्षात त्यांचा मृत्यू झाला. या फायब्रोसिसवर अँटी-फायब्रोटिक औषधे परिणामकारक ठरू शकत नाहीत, हे निराशाजनक आहे. २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुराव्यानुसार (न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन) अँटी-फायब्रोटिक औषधे फायब्रोसिसच्या वाढीचा वेग मंद करू शकतात.

या अभ्यासानंतर आम्ही प्रगत फायब्रोटिक फुप्फुसांच्या आजारासाठी अँटी-फायब्रोटिक औषधे वापरत आहोत. काही रुग्णांच्या बाबतीत आम्ही या आजाराची वाढ मंद करण्यात यशस्वी ठरलो आहोत; पण फायब्रोसिसला समूळ नष्ट करू शकलो नाही. या आजारामुळे रुग्ण हळूहळू कृत्रिम ऑक्सिजनवर जातात. त्यानंतर रुग्णाला पॅलिएटिव्ह मेडिसिन तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवावे लागते. तिथे त्यांचे समुपदेशन केले जाते. ज्यांना परवडते त्यांना फुप्फुस प्रत्यारोपणासाठी पाठवले जाते. तरुण रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागला तर ही स्थिती हाताळणे फार कठीण होते.

विशेष म्हणजे माझ्‌याकडे आलेले सर्व रुग्ण (ज्यांचे फुप्फुस प्रत्यारोपण झाले आहे किंवा त्यासाठी पाठवले गेले आहे) फायब्रोटिक हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिसचे आहेत. जगातील इतर अनेक प्रत्यारोपण केंद्रांमध्ये सर्वाधिक रुग्ण इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसचे असतात. जो प्रामुख्याने ६० वर्षांवरील वृद्धांमध्ये आढळतो.

प्रतिज्ञापत्रात शिफारस

ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कबुतरे जमा होतात तेथून त्यांचे तातडीने उच्चाटन करणे गरजेचे आहे. हाऊसिंग सोसायटीमध्ये पीडितांना बोलण्याची मुभा नसते. अशा ठिकाणी लक्ष केंद्र करणे आवश्यक आहे. सोसायटीतल्या काही सदस्यांमुळे ते आपले म्हणणे मांडू शकत नाही.

पालिकेच्या प्रतिज्ञापत्रात महापालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे कबुतरांच्या थव्यांमुळे संभाव्य आरोग्यविषयक धोक्यांची तपशीलवार माहिती दिली.

जगभरात यासंदर्भात झालेल्या अभ्यासाचे अनेक संदर्भ, वैद्यकीय साहित्याचा हवालाही महापालिकेने दिला आहे. त्यात, 'जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन'ने प्रसिद्ध केलेला लेख, तसेच 'इंडियन जर्नल ऑफ एलर्जी, अस्थमा अँड इम्युनोलॉजी' यांचे दाखले दिले आहेत.

Web Title: Pigeon droppings cause serious lung diseases in children Pulmonologist Dr Sujit Rajan affidavit in the Bombay High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.