पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 06:22 IST2025-11-26T06:21:53+5:302025-11-26T06:22:15+5:30
अभिनेत्रीने तिच्या पतीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या अनेक घटनांची यादी न्यायालयात सादर केली

पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
मुंबई - अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटली हिने तिचा ऑस्ट्रियन पती पीटर हाग याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार व क्रुरतेचा आरोप करत मुंबईउच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पतीने शारिरीक व मानसिक छळ केल्याचा आरोप सेलिनाने केला आहे.
दंडाधिकारी एस. सी. तायडे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने सेलिनाच्या पतीला नोटीस बजावत १२ डिसेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. पतीच्या जाचामुळे ऑस्ट्रियावरून भारतात परतले, असे ती म्हणाली. सेलिना- पीटर यांचा २०१० मध्ये विवाह झाला. त्यांना तीन अपत्ये आहेत. विवाहानंतर पतीने काम करण्यास मनाई केली. पीटर शिघ्रकोपी, दारूडा असल्याचा आरोप सेलिनाने केला आहे.
५० कोटींची पोटगी हवी?
अभिनेत्रीने तिच्या पतीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या अनेक घटनांची यादी न्यायालयात सादर केली. पतीला ५० कोटी रुपये भरपाई म्हणून आणि देखभालीचा खर्च म्हणून दरमहा १० लाख रुपये देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी सेलिनाने अर्जाद्वारे केली आहे. तसेच सध्या ऑस्ट्रियामध्ये पतीबरोबर असलेल्या तीन मुलांना भेटण्याची परवानगी मिळावी, अशीही मागणी तिने केली आहे.