मुंबई : एसटी कर्मचारी, अधिकारी यांची भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि ग्रॅच्युइटीची रक्कम अदा करणे बाकी आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली. त्यावर उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी, कुणाच्याही पीएफचे पैसे कुठेही वापरणे हा फौजदारी गुन्हा ठरतो. त्यामुळे पीएफचे पैसे वापरणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, मंत्री सरनाईक यांनी ती फेटाळल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
डॉ. परिणय फुके यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. एसटीच्या ८९ हजार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी आणि सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम गेले १० महिने जमा करण्यात आली नाही. सुमारे २१०० कोटी इतकी ही रक्कम न भरण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मंत्री सरनाईक यांनी, महामंडळाला ६४ कोटी इतकी मासिक तूट सहन करावी लागत आहे. शासनाकडून ५८२ कोटी आणि मानव विकास योजनेचे २६८ कोटी रुपयांची रक्कम महामंडळाला येणे बाकी आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याज जमा केले जात आहे, असे उत्तर दिले.
तुम्ही सहआरोपी आहात का?
एसटीला मिळणारा निधी पुरेसा नाही. त्यामुळे पीएफ, ग्रॅज्युएटी मिळून २,२१४ कोटी देणे बाकी असल्याची कबुली परिवहन मंत्र्यांनी दिली. त्यावर आ. अनिल परब, आ. भाई जगताप यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या पैशांवर डल्ला मारणे गुन्हा आहे. यात परिवहन मंडळाच्या अध्यक्षांनाही सहआरोपी केले जाते. त्यामुळे तुम्ही सहआरोपी आहात का, असा सवाल केला. त्याला उत्तर देताना परिवहन मंत्री सरनाईक यांनी पीएफच्या व्याजावरील रकमेचे नुकसान झाले नाही. निधीही इतरत्र खर्च केलेला नाही. त्यासंदर्भात तक्रार आली नाही, असे स्पष्ट केले.