Join us  

दिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 7:17 AM

खनिज तेल क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज

मुंबई: पेट्रोलच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. मुंबईसह राज्यभरात पेट्रोलनं नव्वदी पार केली आहे. देशात सर्वात महागडं पेट्रोल मुंबईत मिळतं आहे. देशातील महानगरांचा विचार केल्यास मुंबईनंतर हैदराबादचा क्रमांक लागतो. तर दिल्लीत त्या तुलनेत पेट्रोलचा दर कमी आहे. राज्यात करांचं प्रमाण अतिशय जास्त असल्यानं पेट्रोल, डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलचा दर लवकरच शंभरी गाठेल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलच्या दरांनी नव्वदी ओलांडली. राज्यातील 30 हून अधिक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. पेट्रोल लवकरच शतक गाठेल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या आधीच पेट्रोलच्या दरानं शतक गाठलेलं असेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा वाढत असलेला दर, अमेरिकेनं इराणवर घातलेला बहिष्कार ही कारणं इंधन दरवाढीस कारणीभूत ठरतील, असं विश्लेषण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलं आहे. 'केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलला जीएसटीमध्ये आणण्याच्या मनस्थितीत नाही आणि जीएसटी लागू केल्यामुळे राज्य सरकारं पेट्रोल, डिझेलवरील कराकडे हक्काचं उत्पन्नाचं साधन म्हणून पाहतात. त्यामुळे त्यांच्याकडून कर कपातीची शक्यता दिसत नाही,' असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. 2 सप्टेंबरला मुंबईत पेट्रोलचा दर 86.25 रुपये होता. याआधी 29 मे रोजी पेट्रोलचा दर 86.24 रुपये इतका होता. मे महिन्यातील पेट्रोलच्या दराचा उच्चांक सप्टेंबरमध्ये मोडीत निघाला. गेल्या 7 महिन्यांमध्ये मुंबईत पेट्रोलचा दर 13 टक्क्यांनी वाढला आहे. तर डिझेलच्या दरात 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्चपासून पेट्रोलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दर 12 रुपयांनी वाढला आहे. 

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेल