Join us  

इंधन दरवाढ थांबता थांबेना! मुंबईत पेट्रोल 90.57 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 7:01 AM

पेट्रोलच्या दरात 22 पैशांची, तर डिझेलच्या दरात 19 पैशांची वाढ

मुंबई: देशभरातही आजही इंधनाचे दर वाढलेले आहेत. मुंबईत पेट्रोलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर 90.57 रुपयांवर गेला आहे. तर डिझेलचा दर 19 पैशांनी वाढला आहे. आज मुंबईकरांना डिझेलसाठी 79.01 रुपये मोजावे लागतील. इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. मात्र भरमसाठ आकारणाऱ्या सरकारनं अद्याप जनतेला दिलासा दिलेला नाही. मुंबईसोबतच राजधानी दिल्लीतही इंधनाचे दर वाढले आहेत. राजधानीतही पेट्रोलचा दर 22 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर 83.22 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलच्या दरात 18 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एक लिटर डिझेलसाठी दिल्लीकरांना 74.42 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानं माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भाजीपाल्यांसह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच वाढले आहेत. आतापर्यंत फक्त २९ मे ते ५ जुलैदरम्यान दरात घसरण झाली होती. त्यानंतर ६ जुलै ते २5 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे दर वाढले. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महाग होत आहे. पण केंद्र व राज्य सरकारचे भरमसाट करसुद्धा या दरवाढीला कारणीभूत आहेत. कच्चे तेल महाग होत असतानाही दोन्ही सरकारं कर कमी करून जनतेला दिलासा देण्यास तयार नाहीत. त्यातून दर भडकत असून, महागाईमुळे लोकांची होरपळ सुरू आहे.

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेल