Join us  

Petrol: "मोदींनाच गरिबांची काळजी", इंधन दरकपातीनंतर फडणवीसांची राज्य सरकारला'ही' विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 7:45 PM

महागाई दिवसेंदिवस वाढत असताना देशातील जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली

मुंबई - देशातील इंधन दरवाढ आणि वाढलेल्या महागाईवरुन केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. केंद्राने यापूर्वी इंधनावरील टॅक्स कमी करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं होत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे त्यांनी कोविडच्या बैठकीत हे सूचवलं होतं. मात्र, राज्याने कर न हटविल्यामुळे दरकपात झाली नाही. आता, केंद्र सरकारनेच उत्पादन शुल्क कमी केल्याने इंधन दरात मोठी कपात झाली आहे. त्यावरुन, मोदी सरकारचे अभिनंदन करत देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलं आहे.  

महागाई दिवसेंदिवस वाढत असताना देशातील जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. याबाबतची माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, "आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९ रुपये ५० पैशाने तर डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होतील." केंद्राच्या या निर्णयाचे भाजपमधून सर्वांनीच स्वागत केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन मोदींचा हा निर्णय सर्वसामान्यांसाठी असल्याचं म्हटलं. तसेच, महाराष्ट्र सरकारनेही इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करावेत, अशी मागणीही केली आहे.   नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं की, ते नेहमीच सर्वसामान्यांची काळजी करतात. तसेच, सातत्याने गरिबांच्या कल्याणासाठी काम करतात. माझी महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, राज्य सरकारनेही इंधनदरात कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. तसेच, निर्मला सितारमण यांनी केलेल्या घोषणेचाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरकपातीची माहिती दिली.  

इंधन दरवाढीमुळे महागाईत वाढ

७ एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, गेल्या २२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरात 10 रुपये प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. यामुळे महागाई देखील वाढू लागली आहे. दुधापासुन सर्व पदार्थांच्या दरात, भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता होती.

केंद्राने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये देखील एक्साईज ड्युटीमध्ये कपात केली होती. तेव्हा सरकारने पेट्रोल ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांचा कर कमी केला होता. सध्या पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 27.90 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 21.80 रुपये आकारली जाते. केंद्रात वेगळे सरकार आणि राज्यात वेगळ्या पक्षांचे सरकार असल्याने फक्त केंद्रानेच कमी केलेल्या दरांचा फायदा झाला. राज्य सरकारने दर कमी करण्यास सपशेल नकार दिला होता. यामुळेच राज्यात पेट्रोल, डिझेल इतरांच्या तुलनेत महाग होते. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीपेट्रोलउद्धव ठाकरे