Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत पेट्रोल 88 पार; जनतेच्या खिशावर महागाईचा भार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 07:55 IST

पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला

मुंबई: पेट्रोल, डिझेलच्या दरातील वाढ सुरूच आहे. आज पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 88.12 रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे. डिझेलच्या दरातही 22 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक लिटर डिझेलसाठी 77.32 रुपये मोजावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सतत वाढत आहेत. याविरोधात काँग्रेसनं आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदला देशभरातील 21 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आज पेट्रोलच्या दरात 23, तर डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली आहे. यामुळे नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 80 रुपये 73 पैशांवर जाऊन पोहोचला आहे. तर एक लिटरसाठी डिझेलसाठी 72.83 रुपये मोजण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. इंधन दराचा भडका उडाल्यानं सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे जनतेला महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. सतत होत असलेल्या दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिलेला नाही. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून 'भारत बंद'च्या माध्यमातून केला जात आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेल