खा. संजय पाटलांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली; ठाकरे गटाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 06:45 IST2025-02-11T06:45:15+5:302025-02-11T06:45:44+5:30
याचिकादाराने निवडणूक लढलेल्या अन्य १८ जणांना प्रतिवादी न केल्याने न्यायालयाने त्यांची याचिका २६ नोव्हेंबर रोजी फेटाळली.

खा. संजय पाटलांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली; ठाकरे गटाला दिलासा
मुंबई - उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय दिना पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. याआधी २६ नोव्हेंबर २०२४ रोजीही न्यायालयाने याचिका फेटाळली होती.
मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात संजय दिना पाटील यांच्यासह टॅक्सीचालक शहाजी थोरात हेसुद्धा निवडणुकीसाठी उभे राहिले. त्यांनी सुरुवातीला याचिकेत निवडणूक आयोग व संजय पाटील यांना प्रतिवादी केले. त्यानंतर त्यांनी अन्य उमेदवारांना प्रतिवादी करण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. याचिकादाराने निवडणूक लढलेल्या अन्य १८ जणांना प्रतिवादी न केल्याने न्यायालयाने त्यांची याचिका २६ नोव्हेंबर रोजी फेटाळली.
बचाव पक्षाचा आक्षेप
थोरात यांनीच स्वतःहून न्यायालयात युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान थोरात यांनी १८ उमेदवारांना प्रतिवादी करण्यासाठी अर्ज केला. परंतु, या कारणामुळे याचिका फेटाळली जाऊ नये, यासाठी उमेदवारांना प्रतिवादी करण्यास आता अर्ज करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले. पाटील यांच्यातर्फे ॲड. विजय नायर यांनी थोरात यांच्या पुनर्विचार याचिकेवर आक्षेप घेतला.
याचिका पुन्हा दाखल करून घेणे कितपत योग्य आहे? एक न्यायमूर्ती म्हणून मी एक भूमिका घेतली आणि ती भूमिका अयोग्य आहे, असे तुम्ही म्हणू शकता. पण, मी स्वतःहून ते योग्य करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अपिलात जावे लागेल. - न्या. संदीप मारणे