लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी क्लोजर रिपोर्टवरील सुनावणी नियुक्त न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी करण्यासाठी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली.
गेल्या महिन्यात सीबीआयने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. सुशांतसिंहने १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील घरी आत्महत्या केली होती. गळा दाबून किंवा विष देऊन त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मधील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी हे दावे फेटाळल्याचे सीबीआयने क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
सीबीआयने मंगळवारी दंडाधिकारी के. सी. राजपूत यांना सांगितले की, सीबीआयच्या प्रकरणांवर सुनावणी घेण्यासाठी एस्प्लेनेड दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यास मुख्य दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे. त्यावर दंडाधिकाऱ्यांनी सीबीआयला तशी परवानगी दिली.
प्रकरण काय?सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार पाटणा पोलिसांकडे केली होती. सुशांतसिंहची प्रेयसी रिहा चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांनी सुशांतला लुबाडल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी यांनी केला होता. सीबीआयने रिहा आणि सुशांतच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदविले. तसेच रिहानेही सुशांतसिंहच्या दोन बहिणींविरोधात तक्रार करत सुशांतसिंहच्या मृत्यूस त्या दोघी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल करत सर्वांना क्लीन चीट दिली.