प्रिन्सला भेटण्यासाठी परवानगीची सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 00:10 IST2019-11-16T00:10:22+5:302019-11-16T00:10:33+5:30
केईएम रुग्णालयात हृदयाच्या उपचारासाठी उत्तर प्रदेशहून आलेला प्रिन्स हा तीन महिन्यांचा बालक रुग्णालयात शॉकसर्किट होऊन भाजला गेला.

प्रिन्सला भेटण्यासाठी परवानगीची सक्ती
मुंबई : केईएम रुग्णालयात हृदयाच्या उपचारासाठी उत्तर प्रदेशहून आलेला प्रिन्स हा तीन महिन्यांचा बालक रुग्णालयात शॉकसर्किट होऊन भाजला गेला. या दुर्घटनेत जखमी झाल्याने त्याचा एक हात कापावा लागला. याबाबत पालिकेच्या स्थायी समितीत पडसाद उमटल्यावर प्रिन्ससोबत असलेल्या पालकांसह त्याचे नातेवाईक आणि इतर कोणालाच अधिष्ठात्यांच्या परवानगीशिवाय भेटू देऊ नका, असा फतवाच रुग्णालय प्रशासनाने काढला.
आठवड्याभरापूर्वी केईएम रुग्णालयात ईसीजीवर उपचार घेत असताना मशीनमध्ये बिघाड होऊन तीन महिन्यांच्या चिमुकल्या प्रिन्सचा हात भाजला. त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करून हात काढून टाकावा लागला आहे. या दुर्घटनेबाबत रुग्णालयाच्या हलगर्जीपणाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अधिष्ठातांकडून चौकशी सुरू आहे. प्रिन्सच्या प्रकृतीविषयी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, प्रिन्सची प्रकृती आता सुधारते आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याला प्रतिजैविके देण्यात येत आहेत.
प्रिन्सचे वडील पन्नालाल राजभर यांना घेऊन काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. राजभर यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशच्या महू जिल्ह्यातील आहोत. मागील महिन्याच्या २२, २३ तारखेला मुलाच्या हृदयाला छिद्र असल्याचे समजले.
याबाबत माझ्या मेव्हण्याने मुंबईत बोलावल्यावर मुलाच्या उपचारासाठी आलो. त्यानंतर
हा अपघात घडला. पण मुलावर उपचार नीट करा,
इतकीच आमची मागणी आहे. त्याच्यावर उपचार झाल्यावर
आमच्या गावी जाऊ, असे त्यांनी सांगितले. चार दिवसांनंतर हाडांचे डॉक्टर आले आणि त्यांनी मुलावर शस्त्रक्रिया करावे लागेल, असे सांगितले.
>आयुष्यभर दिव्यांगाचे जीवन जगावे लागणार...
मुलाचा एक हात कापला असून त्याचे डोके आणि छाती जळाली आहे. त्यामुळे त्याला आयुष्यभर दिव्यांगाचे जीवन जगावे लागणार आहे. एका आजारावर उपचार घेण्यासाठी मुंबईत आलो होतो. मात्र मुलाबरोबर दुसराच प्रकार घडला आहे. यामुळे मुलाचे भविष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका, असे आवाहन राजभर यांनी केले आहे.