‘मविआ’च्या १ नोव्हेंबरच्या मोर्चाला मिळाली परवानगी; अचूक माहिती मिळण्यासाठी क्यूआर कोडही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:01 IST2025-10-29T07:01:42+5:302025-10-29T07:01:50+5:30
दुपारी २ वाजता फॅशन स्ट्रीट येथून हा मोर्चा सुरू होईल

‘मविआ’च्या १ नोव्हेंबरच्या मोर्चाला मिळाली परवानगी; अचूक माहिती मिळण्यासाठी क्यूआर कोडही
मुंबई : निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला महाविकास आघाडीतील पक्षांसोबत मनसे व डावे पक्ष मुंबईत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी विरोधकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. भेटीनंतर उद्धवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी संवाद साधताना पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिल्याची माहिती दिली.
खा. सावंत म्हणाले की, या मोर्चाला येणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गाची अचूक माहिती मिळण्यासाठी क्यूआर कोडही प्रसिद्ध केला जाईल. दुपारी २ वाजता फॅशन स्ट्रीट येथून हा मोर्चा सुरू होईल.
मनसे पदाधिकाऱ्यांची मोर्चापूर्वी बैठक
महाविकास आघाडी १ नोव्हेंबरला ‘सत्या’चा मोर्चा काढणार आहे. त्यात मनसेही सहभागी होणार आहे. मात्र, या मोर्चापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. गुरुवारी, ३० ऑक्टोबरला वांद्रे येथील हॉटेल रंगशारदामध्ये ही बैठक होणार आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील महिला आणि पुरुष विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, विभाग सचिव, शाखा अध्यक्ष, सहसचिव, उपशाखा अध्यक्षांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.