अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईमध्ये २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात पाच नवीन महाविद्यालये उघडण्यासाठी परवानगी देण्याचे प्रस्तावित आहे. त्यात दक्षिण मुंबई आणि दादर पश्चिम भागात प्रत्येकी एक महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्याचा मुंबई विद्यापीठाचा विचार आहे. त्यामुळे तब्बल १५ वर्षांनंतर दक्षिण मुंबईत नवे कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळणार आहे तसेच मुंबई विद्यापीठांतर्गत २०२६-२०२७ मध्ये एकूण १५ महाविद्यालये सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या १९ जूनला पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या आराखड्यातील कॉलेजांच्या स्थळबिंदूंना मान्यता देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या रविवारी (दि.२७) पार पडणाऱ्या सिनेट बैठकीत आगामी २०२६-२७ या वर्षाचा बृहत आराखडा मांडला जाणार आहे. त्यात या कॉलेजांच्या स्थळबिंदूना अंतिम मान्यता दिली जाईल. मुंबई विद्यापीठाने पारंपरिक कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमांऐवजी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी अभ्यासक्रमाच्या एकाही नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली जाणार नाही. त्याऐवजी, बहुविद्याशाखीय आणि कौशल्याआधारित अभ्यासक्रम राबविणारे कॉलेज विद्यापीठ सुरू करण्यासाठी परवानगी देणार आहे.
परवानगीसाठी ६५ प्रस्ताव
वर्ष २०२४-२५ मध्ये ६५ नव्या महाविद्यालयांची परवानगी मागणारे प्रस्ताव विद्यापीठाला प्राप्त झाले होते. त्यातील ३३ नव्या महाविद्यालयांना विद्यापीठाने परवानगी दिली आहे. तर ९२ महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम अथवा तुकड्या सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडे परवानगी मागितली होती. त्यातील ५३ महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम अथवा तुकड्या सुरू करण्यासाठी विद्यापीठाने परवानगी दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जबाबदारी घेणार का?
दक्षिण मुंबई आणि दादर या भागात मोठ्या संख्येने महाविद्यालये आहेत. आधीच या भागातील काही महविद्यालयांना विद्यार्थी मिळत नाहीत. त्यात नव्या महाविद्यालयाला विद्यापीठाने का परवानगी दिली आहे हे समजण्यापलीकडे आहे. त्याचा परिणाम मुंबईतील पारंपरिक महाविद्यालयांवर झाल्यास त्याची जबाबदारी विद्यापीठ घेणार आहे का? असा प्रश्न युवासेनेचे नेते आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी उपस्थित केला.
कोठे नवीन कॉलेज?
दादर पश्चिम १दक्षिण मुंबई १मालाड पश्चिम १मुलुंड पूर्व १कांदिवली पूर्व १शहापूर मोहिली अघाई १अंबरनाथ चरगाव/लवाले १सासवणे-मांडवा (अलिबाग) १अलिबाग १रत्नागिरी शहर १दापोली उंबराले १कुडाळ ओरस १सफाळे १जव्हार तळवली १वानगाव १