Perfume spraying machine is now spraying sanitizer | लग्नामध्ये अत्तराचा फवारा करणारी मशीन आता करतेय सॅनिटायझर फवारणी

लग्नामध्ये अत्तराचा फवारा करणारी मशीन आता करतेय सॅनिटायझर फवारणी

कुलदीप घायवट

 मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रत्येकाकडून सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. रहदारीच्या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला जातो. मध्य रेल्वेने चक्क लग्नामध्ये अत्तराचा फवारा करणाऱ्या मशीनचा वापर सॅनिटायझर फवारणीसाठी केला आहे. मध्य रेल्वेने याला 'सॅनिटायझर टनेल' असे नाव दिले आहे. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण, पनवेल याठिकाणी लग्नामध्ये अत्तराचा फवारा करणाऱ्या मशीनचा वापर सॅनिटायझर फवारणीसाठी केला जात आहे. रेल्वे कर्मचारी या मशीन समोर जाऊन निर्जंतुकीकरण द्रव अंगावर मारून आहे. तर, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात  इन-हाउस एक अत्याधुनिक सॅनिटाझर टनेलची निर्मिती केली आहे. हे टनेल तयार करण्यासाठी दोन दिवस लागले. 

मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोको शेड भुसावळ विभागने दोन दिवसाच्या कालावधीत कोरोनाविरोधात लढण्यासाठी एक इन-हाउस, सॅनिटाझर टनेल (निर्जंतुकीकरण बोगदा) तयार केला. येथे तयार  करण्यात आलेल्या सॅनिटाझर टनेलची डिझाईन योग्य आहे. मात्र पनवेल आणि कल्याणमध्ये लग्नामध्ये अत्तराचा फवारा करणाऱ्या मशीनचा वापर करून सॅनिटायझर टनेल केला आहे. 

अत्यावश्यक सेवांमध्ये रेल्वे कर्मचारी काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी सॅनिटाझर टनेल उभारण्यात आला आहे. या मशीनद्वारे चारही बाजूने फवारणी होते. डोक्यापासून ते पायापर्यंत आणि बॅगेवर देखील फवारणी केली  जात आहे,  अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने दिली.

----------------------------------

लग्नात जाताना मंडपाच्या मुख्य दरवाज्याला अत्तराची फवारणी करणारी  मशीन असते. या मशीनच्या  समोर उभे राहून अंगावर अत्तराचा सुगंध येतो. मात्र रेल्वेने मुंबईविभागात तयार केलेल्या सॅनिटाझर टनेल समोर तीन ते पाच सेकंद उभे राहून  डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण निर्जंतुकीकरण करू शकते.

----------------------------------

Web Title: Perfume spraying machine is now spraying sanitizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.