ठळक मुद्देस्टेअरिंग माझ्याकडे आहे, हे आम्हाला सांगून काय फायदा?, ते जे सांगत आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला. कोणाच्या हातात स्टेअरिंग आहे, कोणाकडे ब्रेक आहे, कोणाकडे एक्सिलेटर आहे, हे जगाला माहितीय.
मुंबई - घरातून बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अशी टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. मी कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित चालवतो. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत. पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत. मात्र, हे विधान त्यांच्या मित्र पक्षांसाठी असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, कारचे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे, हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही. ते सगळं सत्तेत सोबत बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते सांगत असतील. जनतेला माहीत आहे कोणाच्या हातात काय आहे, असे फडणवीस यांनी म्हटलंय.
''स्टेअरिंग माझ्याकडे आहे, हे आम्हाला सांगून काय फायदा?, ते जे सांगत आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला. कोणाच्या हातात स्टेअरिंग आहे, कोणाकडे ब्रेक आहे, कोणाकडे एक्सिलेटर आहे, हे जगाला माहितीय. कोण कधी ब्रेक लावतं, कोण एक्सिलेटर वाढवतं. खरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले माझ्या हातात कार आणि सरकार दोन्ही आहे. मुख्यमंत्र्यांनी कार चालवणं सोपं असतं. कारण, मुख्यमंत्री आल्यानंतर ट्रॅफिक थांबलेलं असतं. पण, इथं समस्यांचा ट्रॅफिक सुरु असतं. त्यावेळी, कोणी मित्र ब्रेक लावतात, कोणी एक्सीलेटर वाढवतात, मग कुणी आपल्याच हातात स्टेअरिंग असल्याची घोषणा करतं,'' असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्टेअरिंग विधानावर पलटवार केलाय.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. सध्या मी कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत. पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. भाजपकडून वारंवार होणारी टीका, नामांतरामुळे सत्तेत असलेल्या पक्षासोबत सुरू असलेलं वाकयुद्ध या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान अतिशय सूचक मानलं जात आहे.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: The people know what is in whose hands, Fadnavis retaliates against the Chief Minister
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.