Join us
Daily Top 2Weekly Top 5

माणसाला माणूसपण देण्यासाठी जगलो - भरत वाटवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 05:51 IST

समाजात राहणाऱ्या एका व्यक्तीला तरी आपण बरे करू शकलो पाहिजे, या विश्वासाने काम सुरू केले, असे प्रतिपादन शनिवारी ‘रॅमन मॅगेसेसे’ पुरस्कार जाहीर झालेले मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी केले.

मुंबई : आयुष्यात जे काही केले, ते माणसाला माणूसपण देण्यासाठी केले. सुरुवातीला वेगळे काम करीत असल्याने त्रास झाला, पण समाजात राहणाऱ्या एका व्यक्तीला तरी आपण बरे करू शकलो पाहिजे, या विश्वासाने काम सुरू केले, असे प्रतिपादन शनिवारी ‘रॅमन मॅगेसेसे’ पुरस्कार जाहीर झालेले मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी केले.मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे ‘रॅमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते २०१८ सन्मान सोहळा’ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते डॉ. भरत वाटवानी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना सन्मानित करण्यात आले.भरत वाटवानी म्हणाले, आज वेगवेगळे आजार अनेकांना होतात. मात्र, अजूनही आपण मानसिक आजाराचे रुग्ण आहोत हे मानायला पटकन तयार होत नाही. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मानसिक आजाराबाबत धडे देणे, विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्याबाबत आणि मानसिक आजाराबाबत माहिती देणे आवश्यक आहे.सोनम वांगचुक म्हणाले, शिक्षणात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. लडाखमध्ये शिक्षण व्यवस्था सुधारित आहे. शिक्षणात सुधारणा होणे काळाची गरज आहे. मातृभाषेतून मुलांना शिक्षण द्यावे, यासाठी आपण आग्रही असणे आवश्यक आहे. मनात इंग्रजी भाषा किंवा अन्य कोणत्याही भाषा येत नाहीत म्हणून न्यूनगंड बाळगता कामा नये. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना, बदलत्या शिक्षण पद्धतीप्रमाणे बदल केला आहे.विनोद तावडे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात काळानुरूप बदल होत आहे, पण येणाºया काळात शिक्षण क्षेत्राला पुढे नेताना सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवानी यांच्यासारख्यांची महाराष्ट्राला गरज आहे. समाजातील प्रत्येकामधील भावनिक बुद्ध्यांक वाढविण्यासाठी या दोघांनी महाराष्ट्राचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करावे, जेणेकरून त्यांच्या कामामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल.

टॅग्स :विनोद तावडे