मुंबई : घर खरेदी करताना केलेल्या करारानुसार पैसे न भरणाऱ्या ग्राहकाला थकविलेली रक्कम व्याजासह भरण्याचे आदेश महारेराने दिले. तसेच, महिन्याभरात ही रक्कम न भरल्यास घर खरेदीचा करार रद्द करण्याची मुभाही विकासकाला दिली.ठाण्यातील कोठारी कम्पाउंड नजीकच्या टी. भीमजयानी या बांधकाम व्यावसायिकाच्या नीळकंठ वुड्स या गृहप्रकल्पात एका दाम्पत्याने ३० व्या मजल्यावरील ३००२ आणि ३००१ या क्रमांकांच्या फ्लॅटसाठी नोंदणी केली होती. त्याची किंमत अनुक्रमे २ कोटी ५ लाख आणि २ कोटी ३५ लाख होती. त्यापैकी १ कोटी ७४ लाख आणि १ कोटी ५२ लाखांचा भरणा दाम्पत्याने केला होता. मात्र, या व्यवहारांतील जीएसटीपोटीचे अनुक्रमे १८ लाख १९ हजार आणि १५ लाख १० हजार रुपये त्यांनी भरले नव्हते. करारात नमूद केल्यानुसार ही रक्कम भरण्यासाठी सातत्याने स्मरणपत्र पाठविल्यानंतरही ती अदा केली जात नव्हती.थकीत रकमेपोटी विकासकाने एप्रिल, २०२० पर्यंतच्या व्याजापोटी सुमारे १५ लाखांच्या व्याजचीही मागणी केली होती. महारेराने आपापसात तडजोड करण्यासाठी दिलेल्या अवधीत हा वाद मिटला नव्हता. त्यानंतर महारेराचे सदस्य विजय सतबीर सिंग यांनी विकासकाचा युक्तिवाद ग्राह्य ठरविला. थकविलेली रक्कम पुढील एक महिन्यात व्याजासह अदा करण्याचे निर्देश दाम्पत्याला दिले. तसेच, या कालावधीत हा व्यवहार पूर्ण न झाल्यास विकासकाला करारातील अटी-शर्थीनुसार गृह खरेदीचा करार रद्द करता येईल, असेही आदेशात नमूद आहे.
थकीत रक्कम व्याजासह भरा; अन्यथा घर खरेदीचा करार रद्द- महारेरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 03:44 IST