मुंबई : दक्षिण मुंबईतील भुलाबाई देसाई रोडवरील ‘सिल्व्हर ओक’ हे शरद पवार यांचे निवासस्थान शुक्रवारी राजकीय घडामोडींचे केंद्र बनले होते. केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांचा दिवसभर राबता होता. राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय पेचप्रसंगामुळे दुष्काळ दौरा अर्धवट सोडून खा. पवार तातडीने मुंबईत दाखल झाले. दिवसभर त्यांनी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भूजबळ, धनंजय मुंडे आदी नेत्यांसोबत बैठक घेऊन पक्षाची रणनिती ठरविली. त्यानंतर रामदास आठवले हे आकस्मिकपणे सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यांनी पवारांशी सुमारे अर्धा तास बंदद्वार चर्चा केली. पवारांचा राजकीय सल्ला घेण्यासाठी आलो होतो, असे आठवले यांनी सांगितले. मात्र नेमका काय सल्ला घेतला ते सांगितले नाही.
सांयकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सिल्व्हर ओक’ गाठले. फडणवीस यांची पत्रकार परिषद तिथेच त्यांनी पाहिली. पवारांशी खलबतं केल्यानंतर राऊत निघून गेले. भाजप-शिवसेनेत बिनसले असल्याचे लक्षात येताच सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनीही पवारांचा बंगला गाठला. त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर पवारांशी चर्चा केली. त्याचवेळी पुन्हा खा. राऊत तेथे आले. त्यांच्यात उशिरापर्यंत बैठका सुरु होती.