पवार, काँग्रेसकडून नेहमीच कृषी कायद्यांचे समर्थन - देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 07:37 AM2020-12-08T07:37:04+5:302020-12-08T07:37:28+5:30

Devendra Fadnavis News : बाजार समित्यांची मक्तेदारी संपवून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे समर्थन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने नेहमीच केले. आघाडी सरकारच्या काळातच त्यासाठीचे कायदेही झाले.

Pawar, Congress always supports agricultural laws - Devendra Fadnavis | पवार, काँग्रेसकडून नेहमीच कृषी कायद्यांचे समर्थन - देवेंद्र फडणवीस 

पवार, काँग्रेसकडून नेहमीच कृषी कायद्यांचे समर्थन - देवेंद्र फडणवीस 

Next

मुंबई : बाजार समित्यांची मक्तेदारी संपवून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे समर्थन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने नेहमीच केले. आघाडी सरकारच्या काळातच त्यासाठीचे कायदेही झाले. आता त्यांच्याकडून होत असलेला विरोध हा निव्वळ दुटप्पीपणा असून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

उद्याचा विरोधी पक्षांचा बंद हा शेतकऱ्यांची दिशाभूल कराणारा आणि शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारा असल्याचे फडणवीस म्हणाले. काँग्रेसच्या २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात सध्याचा बाजार समित्यांचा कायदा रद्द करुन शेतमालाच्या व्यापाराची पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाईल, असे आश्वासन दिलेले होते. 

शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना बाजारपेठांमध्ये खासगी गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करणारे आणि मॉडेल बाजार समिती कायद्याची गरज प्रतिपादित करणारे पत्र त्यांनी देशातील मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. एवढेच नव्हे तर पवार यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात त्यांनी, शेतकऱ्याला आपला माल कुठेही विकता यावा, बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढायला हवी.  शेतीमाल बाजार समितीतच विकण्याचे बंधन नसावे असे मत व्यक्त केलेले आहे.

बारामतीतील शेतकरी मुंबईच्या बाजार समितीत माल नेतो तेव्हा उत्पादन मूल्याच्या १७ टक्के खर्चाचा बोजा त्याच्यावर पडतो. साठवणूक, वेष्टनांच्या सोईअभावी देशातील शेतकऱ्यांचे दरवर्षी ५५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. कृषी माल मंडईतच विकला पाहिजे हे बंधन निश्चितच चूक असल्याची भूमिका पवार यांनी मांडली होती, असेही फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले. विरोधी पक्षांचा बंद हा शेतकऱ्यांची दिशाभूल कराणारा असल्याचे फडणवीस म्हणाले. उद्याच्या बंदमध्ये असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी हे बाजार समित्यांची मक्तेदारी संपविण्याची भूमिका घेत आले आहेत. सपा, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आपनेदेखील हीच भूमिका मांडली आहे याकडे फडणवीस यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. 

त्या दिवशी पर्यायी सरकार नक्कीच देऊ
 महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. याकडे लक्ष वेधले असता फडणवीस खोचकपणे म्हणाले की, आमचा सरकार पाडण्याचा प्लॅन कोणता आहे ते मी गहलोत यांना विचारणार आहे. सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न आमच्याकडून सुरू नाही पण अंतर्विरोधाने हे सरकार पडेल त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार नक्कीच देऊ.
 

Web Title: Pawar, Congress always supports agricultural laws - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.