Join us  

‘मेट्रो ६’ची कारशेड कांजूरला उभारण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 2:57 PM

१५ हेक्टर जागेवर या मेट्रो कारशेडची उभारणी केली जाईल. त्यासाठी ५०८ कोटींचा खर्च येणार आहे. पुढील ३० महिन्यांत ही मार्गिका उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारी समितीच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या ‘मेट्रो ६’ मार्गिकेसाठी सॅम इंडिया बिल्टवेल या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात कांजूरमार्ग येथील जागेवर कारशेडच्या उभारणीला सुरुवात होईल. १५ हेक्टर जागेवर या मेट्रो कारशेडची उभारणी केली जाईल. त्यासाठी ५०८ कोटींचा खर्च येणार आहे. पुढील ३० महिन्यांत ही मार्गिका उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या मार्गिकेमुळे ओशिवरा ते कांजूरमार्ग हा प्रवास जलद होणार आहे. तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरे एकमेकांना जोडली जातील. त्यामुळे प्रवास सुखकर होण्यासाठी मदत मिळणार असून, तासनतास वाहतूककोंडीत अडकून राहावे लागणार नाही. कारशेड उभारणीसाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये सॅम बिल्टवेल या कंत्राटदाराची निविदा सर्वांत कमी किमतीची ठरली. त्यांना कंत्राट देण्यासाठी ‘एमएमआरडीए’ कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली. 

- मेट्रोची लांबी - १५.३१ किमी  n स्थानके - १३  n खर्च - ६,७१६ कोटी  - अपेक्षित प्रवासी - ७.७ लाख  n पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणी.  

टॅग्स :मेट्रोरेल्वे