पावभाजी ७० रुपयांत! उमेदवारांच्या खर्चासाठी पालिकेची दरसूची जाहीर; शाकाहारी जेवण ११० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:55 IST2026-01-03T14:54:11+5:302026-01-03T14:55:02+5:30
नामनिर्देशनपत्र भरल्यानंतर उमेदवाराच्या दैनंदिन खर्चाचा हिशेब पालिकेच्या निवडणूक विभागाकडून दररोज नोंदविण्यात येतो. उमेदवारांनाही तो सादर करणे बंधनकारक आहे. हा खर्च दाखवताना त्यांनी कोणत्या वस्तूंचे किती दर लावावेत, हे पालिकेने ठरवून दिले आहेत.

पावभाजी ७० रुपयांत! उमेदवारांच्या खर्चासाठी पालिकेची दरसूची जाहीर; शाकाहारी जेवण ११० रुपये
सीमा महांगडे -
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका निवडणुकीतील उमेदवारांना १५ लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. त्यापाठोपाठ पालिकेने खाद्यपदार्थ, पाणी, शीतपेय, प्रचार साहित्य, वाहने, फटाके आदींचेही दर ठरविले आहेत. त्यानुसार शाकाहारी जेवण ११० रुपये, पावभाजी ७० रुपये, वडापाव प्रतिप्लेट १५ रुपयांत कार्यकर्त्यांना खाऊ घालायचा आहे. मुंबईतील खाद्यपदार्थांसह सर्वच साहित्यांच्या किमती विचारात घेता, खर्चाचा हिशेब देताना उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
नामनिर्देशनपत्र भरल्यानंतर उमेदवाराच्या दैनंदिन खर्चाचा हिशेब पालिकेच्या निवडणूक विभागाकडून दररोज नोंदविण्यात येतो. उमेदवारांनाही तो सादर करणे बंधनकारक आहे. हा खर्च दाखवताना त्यांनी कोणत्या वस्तूंचे किती दर लावावेत, हे पालिकेने ठरवून दिले आहेत. राजकीय पक्षांनाही त्याची दरसूची पालिकेने पाठविली आहे. उमेदवारांना सर्व खर्च त्यांच्या स्वतंत्र बँक खात्यातून करावा लागणार आहे.
भरारी पथकांची देखरेख
शहर आणि पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, अशा एकूण २२७ प्रभागांमधील उमेदवारांच्या खर्चाची नोंद ठेवण्यासाठी पालिकेचे प्रभागनिहाय स्वतंत्र पथक असणार आहे. त्याचबरोबर भरारी पथकेही खर्चावर देखरेख ठेवणार आहेत.
फेस मास्क, स्कार्फ, टोप्या, खुर्च्या, स्टेज...
सध्या थंडीचे दिवस असल्याने कार्यकर्त्यांना स्कार्फ, टोप्या, फेस मास्कचीही गरज लागू शकते. त्याचबरोबर निवास व्यवस्था, सभांसाठी खुर्च्या, स्टेजची व्यवस्था, फटाके, बॅण्ड पथक, इतकेच काय, प्रचार साहित्य व सुरक्षा रक्षकांचे दरही निश्चित केले आहेत.
खाद्यपदार्थ दर -
चहा १०
कॉफी १२
पोहे / उपमा / शिरा / इडली सांबर / २५
साबुदाणा खिचडी / मिसळ पाव /
ढोकळा / भेळ (प्रतिप्लेट)
वडापाव (प्रतिप्लेट) १५
लंच / डिनर (व्हेज) ११०
लंच / डिनर (नॉनव्हेज) १४०
पुलाव ७५
पुरी भाजी ६०
कोल्ड्रिंक (छोटी बाटली) १०
कोल्ड्रिंक (मोठी बाटली) ४०
पावभाजी ७०
पाणी बाटली (२०० मिली) ०५
पाणी बाटली (५०० मिली) १०
पाणी बाॅटल १ लिटर २०
पाण्याचा जार २० लिटर ८०
बँड पथक, फटाक्यांचे दर
साहित्य दर
ढोल, ताशा, झांज (प्रति व्यक्ती) १०००
बँड पथक (प्रति व्यक्ती) १२००
फटाके (२०० फुटांची माळ) ५००
सुतळी बॉम्ब (प्रति नग) ५०
फटाक्यांची आतषबाजी (प्रति नग) १५००
स्कार्फ (प्रति नग) १०
फेस मास्क (प्रति नग) ०५
टोपी (प्रति नग) १२