Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्रा चाळ रहिवाशांना मिळाली १०% भाडेवाढ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीत घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 06:56 IST

इमारतीची दुरुस्ती करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, पत्रा चाळीत दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे स्वतः नवीन इमारतींना भेट देऊन केलेल्या कामांचा दर्जा तपासणार आहेत.

मुंबई - गोरेगावमधील पत्रा चाळीच्या रहिवाशांना १० टक्के भाडेवाढ देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. रहिवाशांच्या विविध प्रश्नांबाबत ही बैठक होती. रहिवाशांच्या मागणीनुसार त्यांना सध्या मिळत असलेल्या २५ हजार एवढ्या भाड्याच्या रकमेत १० टक्क्यांनी वाढ करण्याचा हा निर्णय आहे.

म्हाडाच्या इमारतींची डागडुजी करून त्यानंतर त्या हस्तांतरित करण्यात याव्यात. कंत्राटदार दर्जेदार काम करतो अथवा नाही, हे पाहण्यासाठी म्हाडाचा अधिकारी आणि स्थानिक रहिवासी यांची संयुक्त समिती स्थापन करून त्यांच्या माध्यमातून या कामावर देखरेख ठेवण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच रहिवाशांना हवे आहे, तशा मंदिराचा नकाशा त्यांनी म्हाडाकडे द्यावा. त्यानुसार म्हाडा नवीन मंदिर बांधून देईल, असेही बैठकीत निश्चित केले. बैठकीला नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आ. विद्या ठाकूर, खा. रवींद्र वायकर, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष  संजीव जयस्वाल, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, शिव उद्योग सेनेचे उदय सावंत आणि पत्रा चाळीतील रहिवासी उपस्थित होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णयपत्रा चाळ रहिवाशांच्या रखडलेल्या घरांचा प्रश्न म्हाडाच्या माध्यमातून सोडविण्यात आल्यानंतरही काही रहिवाशांनी घरांचा ताबा घेतला नव्हता. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत. 

शिंदे स्वतः तपासणार दर्जाखासगी विकासकांनी पत्रा चाळवासीयांची फसवणूक केल्यानंतर म्हाडाने अर्धवट अवस्थेत असलेल्या इमारती ताब्यात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करून दिला. कॉर्पस फंड कमी मिळत असल्याने म्हाडाने २३ अतिरिक्त सदनिका पत्रा चाळ रहिवाशांना दिल्या असून, त्यांच्या भाड्याच्या माध्यमातून अतिरिक्त कॉर्पस फंड उभा करण्यात येणार आहे. पत्रा चाळीत दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे स्वतः नवीन इमारतींना भेट देऊन केलेल्या कामांचा दर्जा तपासणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pattra Chawl Residents to Get 10% Rent Hike: Shinde Decides

Web Summary : Deputy Chief Minister Eknath Shinde approved a 10% rent increase for Pattra Chawl residents. MHADA will repair buildings and transfer them, overseen by a joint committee. MHADA will also build a new temple as requested. Shinde will personally inspect construction quality.
टॅग्स :एकनाथ शिंदे