Mumbai: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीमध्ये प्लास्टर कोसळले! रहिवाशांनी राहायला जायचं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:26 IST2025-04-04T14:24:08+5:302025-04-04T14:26:14+5:30
Patra Chawl Plaster Collapse: म्हाडाकडून शुक्रवारी सोडत काढली जाणार असतानाच गुरुवारी सकाळी एका नव्या इमारतीमध्ये प्लास्टर कोसळले.

Mumbai: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीमध्ये प्लास्टर कोसळले! रहिवाशांनी राहायला जायचं कसं?
गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातून उभारलेल्या इमारतींमधील सदनिकांची म्हाडाकडून शुक्रवारी सोडत काढली जाणार असतानाच गुरुवारी सकाळी एका नव्या इमारतीमध्ये प्लास्टर कोसळले. त्यामुळे रहिवाशांनी म्हाडाच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे चिठ्ठी टाकून सोडत काढण्यावर रहिवासी, तर संगणकीय लॉटरीवर म्हाडा ठाम आहे. त्यामुळे या लॉटरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गोरगाव सिद्धार्थनगर सहकारी (पत्राचाळ) संस्थेच्या अंबामाता मंदिर व कल्पतरु इमारतीच्या दिशेला असलेल्या आर-९ पुनर्वसन प्रकल्पातील नवीन इमातीचे मोठे प्लास्टर कोसळले. २ एप्रिलला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असले तरी नवीन इमारतीचे बांधकाम निकृष्ट कसे, या सर्व बाबींची अभियंता विभागाने पाहणी केली नाही का, की सोडतीसाठी भोगवटा प्रमाणपत्र दिले, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
२४० कोटी रुपयांचे म्हाडाने दिले कंत्राट
मेसर्स रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड हा बांधकाम कंत्राटदार काळ्या यादीत असून तसा त्याच्यावर ठपका आहे. असे असतानाही त्याा २४० कोटी रुपयांचे कंत्राट म्हाडाने दिले आहे. आता बांधकामांच्या दर्जाबाबत पत्राचाळ रहिवासी साशंक आहेत. कारण अशी घटना यापूर्वी दोनवेळा घडली आहे. आता सदनिकांचा ताबा घेण्याच्या वेळेला अशी घटना घडणे दुर्देवी आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
१६ विंगना भोगवटा प्रमाणपत्र
- म्हाडाने घाईघाईने ८ इमारतींच्या १६ विंगना भोगवटा प्रमाणपत्र दिल्याचेही जाहीर केले आहे.
- वसाहतीतील काही कामे अद्याप बाकी
- घाईघाईने घरांची सोडत काढू नका, असा ठराव संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत झाला.
- म्हाडाचे काही अधिकाऱ्याच्या हट्टामुळे सोडतीचा घाट घातला जात आहे, असा भाडेकरुंचा आरोप.
- प्लास्टर कोसळण्याच्या प्रकारानंतर तरी म्हाडाने सोडत पुढे ढकलून आधी दुरूस्तीचे काम घ्यावे, अशी भाडेकरुंची मागणी आहे.
बांधकामाच्या पाहणीस मनाई
१. म्हाडाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमलेला नाही. संस्थेने नियुक्त केलेल्या पीएमसीलाही म्हाडा सर्व इमारतींच्या बांधकामाची पाहणी करायला देत नाही. वारंवार पत्रव्यवहार करुन म्हाडाच्या कार्यकाही अभियंता विभाग व कंत्राटदार सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत.
२. म्हाडा वेळ काढायचे काम करत आहेत. जेणेकरुन रहिवासी घाईत घरांचा ताबा घेतील व म्हाडानंतर डागडुजी करत राहील. कंत्राटदाराच्या बांधकामाकडे म्हाडा दुर्लक्ष करत आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.