अखेर कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, ८ हजार रहिवाशांना घरे मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:51 IST2026-04-09T11:51:02+5:302026-04-09T11:51:02+5:30
म्हाडाला ४४ हजार चौरस मीटर जागा उपलब्ध होणार

अखेर कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, ८ हजार रहिवाशांना घरे मिळणार!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाने भगीरथी हाउसिंग प्रा. लि आणि माथी डेव्हलपर्स प्रा. लि यांना स्वीकृती पत्र (लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स) दिले आहे. या दोन्ही बांधकाम व्यावसायिकांना तेथील रहिवाशांचे संमती पत्र घेणे, घरे रिकामी करून त्याचे बांधकाम पाडणे आणि त्यानंतर नवीन इमारती उभाराव्या लागणार आहेत. या प्रकल्पामुळे आठ हजार भाडेकरू-रहिवाशांना हक्काचे नवीन घर मिळणार आहे.
म्हाडाच्या विशेष प्रकल्प कक्षामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीद्वारे हा प्रकल्प राबविला जाईल. कामाठीपुरा परिसरातील लेन १ ते १५ या भागाचा पुनर्विकास होणार आहे.
कामाठीपुरा प्रकल्पासंदर्भातील सगळी औपचारिकता पुढील दोन ते महिन्यांत पूर्ण होईल. यावर्षी काम सुरू होईल. आठ ते दहा वर्षांत पुनर्वसनाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पात म्हाडाला साडेआठ टक्के बिल्टअप एरिया मिळणार आहे. दरम्यान, दोन ते महिन्यांत सी अँड डी ए अॅग्रीमेंट होईल. पुनर्वसनाच्या कामाची सुरुवात या वर्षाअखेरपर्यंत होईल, अशी माहिती म्हाडाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
४५ दिवसांमध्ये विशेष कंपनीची स्थापना
दोन्ही बांधकाम व्यावसायिकांना एकत्र येऊन ४५ दिवसांमध्ये कामाठीपुरा प्रकल्पासाठी विशेष कंपनी स्थापन करावी लागणार आहे. तसेच करारानुसार, परफॉर्मन्स बँक गॅरंटी सादर करणे आणि आवश्यक करारांची अंमलबजावणी करणेही अनिवार्य आहे.
- ७३,१४४.८४ - चौरस मीटर भूखंडाचे क्षेत्रफळ संपूर्ण कामाठीपुरा भागातील आहे
- ९४३ - उपकरप्राप्त इमारती
- ३४ - एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक १ ते १५ मध्ये ९४३ उपकरप्राप्त इमारती आहेत.
- ८०० - जमीन मालक
- ६,६२५ निवासी व १,३७६ अनिवासी, असे एकूण ८,००१ भाडेकरू-रहिवासी वास्तव्यास आहेत.
- १०० - वर्षे जुन्या इमारती कामाठीपुरात आहेत.
४,५०० - सदनिका उपलब्ध
म्हाडास या प्रकल्पाद्वारे ४४ हजार चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध होणार असून, मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होईल. विकासकास पाच लाख ६७ हजार चौरस मीटर क्षेत्र मिळणार असून, अंदाजे ४,५०० सदनिका उपलब्ध होतील.