Join us

पतंजलीच्या ‘कोरोनील’ विक्रीस परवानगी नाही; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:43 IST

औषध विकण्यासाठी योग्य प्रमाणीकरण आवश्यक

मुंबई : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रामदेवबाबांच्या पतंजली संस्थेने बनविलेल्या कोरोनील या औषधावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबाबतचे योग्य प्रमाणीकरण मिळाल्याशिवाय हे औषध महाराष्ट्रात विक्रीसाठी परवानगी दिली जाणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे.

पंतजलीने कोरोनापासून प्रतिबंध करण्यासाठी कोरोनील हे औषध बाजारात आणले आहे. केंद्र सरकारमधील दोघा ज्येष्ठ मंत्र्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. याबाबत गृहमंत्री म्हणाले, आयएमएबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेनेही हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा दावा फेटाळला आहे. घाईघाईने हे औषध बाजारात आणणे चुकीचे आहे, ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी त्याला तातडीने समर्थन देणे योग्य नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. 

‘नागरिकांनी जाहिरातीस बळी पडू नये’

मुख्य आरोग्य संस्थांसह इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. त्याची पूर्तता झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील या औषधाला विक्रीसाठी महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही. त्याबाबतच्यया सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही यासंदर्भातील जाहिरातीला अजिबात बळी पडू नये, असे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केले.

नियम पाळणे गरजेचे!काेराेना संसर्ग राेखण्यासाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर अशा प्रतिबंधात्मक नियमांचा वापर प्रत्येकाने करायला हवा, असे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केलेे.

टॅग्स :पतंजलीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस