'कोस्टल'वर १.७९ कोटी वाहने सुसाट; स्वातंत्र्यदिनापासून दोन्ही मार्गिका २४ तास खुल्या
By सीमा महांगडे | Updated: August 16, 2025 11:59 IST2025-08-16T11:53:22+5:302025-08-16T11:59:57+5:30
१८ महिन्यांमध्ये दक्षिण मार्गिकेवरून एक कोटी, तर उत्तर मार्गिकेवरून ७९ लाख वाहनांचा प्रवास

'कोस्टल'वर १.७९ कोटी वाहने सुसाट; स्वातंत्र्यदिनापासून दोन्ही मार्गिका २४ तास खुल्या
सीमा महांगडे
मुंबई: मुंबईकरांना वेगवान प्रवासाचा अनुभव देणाऱ्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या (कोस्टल रोड) दोन्ही मार्गिका आतापर्यंत सकाळी आठ ते मध्यरात्री १२पर्यंत वाहतुकीसाठी खुल्या होत्या. मात्र, प्रशासनाने नागरिकांना स्वातंत्र्यदिनाची भेट देत या दोन्ही मार्गिका २४ तास खुल्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, १८ महिन्यांत आतापर्यंत या मार्गिकांवरून एक कोटी ७९ लाख वाहनांनी प्रवास केला आहे. त्यांपैकी दक्षिण मार्गिकेवरून ११ ऑगस्टपर्यंत एक कोटी वाहनांनी, तर उत्तर मार्गिकेवरून आतापर्यंत ७९ लाख वाहनांनी प्रवास केला आहे.
कोस्टल रोडची वरळी ते मरिन ड्राइव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका मागील वर्षी मार्चमध्ये, तर उत्तरवाहिनी ११ जूनपासून सुरू झाली. सुसाट वाहतूक, किनारी मार्गाचा अनुभव देणाऱ्या आणि कमी वेळात हव्या त्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या कोस्टल रोडबाबत मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे तो खुला होताच मुंबईकरांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे.
दरम्यान, वरळी आणि मरिन ड्राइव्हदरम्यानचा अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास आता १० ते १५ मिनिटांवर आला आहे.
१८ आंतरमार्गिका; १५ खुल्या
मरिन ड्राइव्ह ते वांद्रे वरळी सी-लिंक हा तब्बल १०.८ कि.मी. लांबीचा कोस्टल रोड आहे. त्यात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी अनेक आंतरबदल मार्गिका दिल्या आहेत. यामुळे प्रवाशांना या मार्गिकांचा वापर करून इच्छित स्थळी वळसा न घालता पोहोचता येणार आहे. अशा एकूण १८ आंतरमार्गिका 'कोस्टल'वर असून, त्यांतील १५ खुल्या करण्यात आल्या आहेत.
२३६ सीसीटीव्हींचा वॉच
सुरक्षित वाहतुकीसाठी व वेगमर्यादेवर नियंत्रणासाठी पालिकेने या मार्गावर एकूण निरनिराळी वैशिष्ट्ये असलेले २३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. आता ते कार्यान्वित झाले आहेत.
दोन हजार दैनंदिन वाहने
कोस्टल रोडवरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनांची सरासरी संख्या अंदाजे दोन हजार असून, आता मार्गिका २४ तास खुल्या केल्यानंतर यात वाढ होईल, अशी अपेक्षा पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.