Join us  

मेट्राेकडे प्रवाशांनी घेतली धाव, तर बेस्टकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 4:02 AM

रेल्वे सेवा सुरू झाल्याचा परिणाम; उत्पन्नवाढीची बेस्टला चिंता

मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या प्रवासी संख्येत गेल्या आठवडाभरात सुमारे एक लाख एवढी घट झाली. त्यामुळे उत्पन्न वाढीची चिंता सतावणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे २३ मार्चपासून मुंबईतील लोकल सेवा सर्वांसाठी बंद करण्यात आली. त्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट बसगाड्यांनी दिलासा दिला, तर ‘मिशन बिगीन अगेन’चा पहिला टप्पा जून महिन्यात सुरू झाल्यानंतरही सर्वसामान्य मुंबईकरांना बेस्ट बसचाच आधार होता. या काळात प्रवासी संख्या वाढून १७ लाखांवर पोहाेचली.मुंबईतील सर्व व्यवहार आता हळूहळू सुरू झाले आहेत. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत बसगाड्यांमधून दररोज सरासरी २८ लाख प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, १ फेब्रुवारी २०२१पासून लोकल सेवा मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा काही प्रवासी रेल्वे प्रवासाकडे वळले आहेत. याचा परिणाम बेस्टच्या प्रवासी संख्येवर झाला. गेल्या आठवड्यात दररोज सरासरी १० ते २० हजार प्रवासी संख्येत घट दिसून आली.मेट्रो प्रवाशांची संख्या झाली एक लाखकोरोना काळात मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या मेट्रोच्या प्रवाशांचा आकडा आता एक लाखांवर गेला आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मुंबई मेट्रो धावत आहे. १९ ऑक्टोबरपासून मेट्रो रेल मार्गावर आली. तत्पूर्वी ती कोरोनामुळे बंद होती. १९ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी खुल्या करण्यात आलेल्या मेट्रोने प्रवाशांना दिलासा दिला असतानाच मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत भर पडू लागली आहे. आजघडीला मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या एक लाख झाली असून, प्रवाशांची संख्या वाढत असल्याने मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. मेट्रोच्या फेऱ्या २४० वरून २५६ झाल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये वर्सोवा स्थानकातून पहिली मेट्रो सकाळी ६.५० वाजता सुटत असून, घाटकोपर स्थानकातून शेवटची मेट्रो १०.१५ वाजता सुटत आहे. मेट्रो सुरु होण्याच्या १५ मिनिटांपूर्वी मेट्रोची प्रवेशद्वारे खुली केली जात आहेत.या मार्गांकडे वळवणार लक्ष२९ जानेवारी रोजी बेस्ट उपक्रमामार्फत ४३०१ बस गाड्या चालवण्यात आल्या होत्या. या बसगाड्यांमधून २६ लाख प्रवाशांनी प्रवास केला, तर ५ फेब्रुवारी रोजी ४,१३८ बसगाड्यांमधून २५ लाख प्रवाशांनी प्रवास केला.छोट्या मार्गांवर म्हणजे घरापासून रेल्वेस्थानकापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ७० टक्के आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने यापुढे अशा मार्गांना प्राधान्य देऊन जादा बस चालवण्याचे निश्चित केले आहे.

टॅग्स :मेट्रोबेस्ट