प्रवाशांनो, लोकलमधील गर्दीची चिंता मिटणार; प्लॅटफॉर्म वाढविण्याच्या कामाचा सर्व्हे होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 09:40 IST2024-08-18T09:40:22+5:302024-08-18T09:40:44+5:30
मध्य रेल्वेवरील गर्दीमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली या पट्ट्यात लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत.

प्रवाशांनो, लोकलमधील गर्दीची चिंता मिटणार; प्लॅटफॉर्म वाढविण्याच्या कामाचा सर्व्हे होणार
मुंबई : कल्याणपासून कर्जत आणि कसारापर्यंत १५ डब्यांच्या लोकल थांबविता याव्यात म्हणून येथील प्लॅटफॉर्म वाढविण्याच्या कामाचा सर्व्हे मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात येत आला आहे. या सर्व्हेनुसार प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्यास कर्जत, कसाऱ्याहून भरून येणाऱ्या लोकलमधील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वेवरील गर्दीमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली या पट्ट्यात लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. लोकलमधील गर्दी कमी व्हावी आणि अपघात थांबावेत यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेला विविध उपाय सुचविले आहेत. यामध्ये प्रामुख्याने लोकल फेऱ्या वाढविण्यासोबत लोकलच्या लाइनवरून मेल/एक्सप्रेसऐवजी लोकलच सोडाव्यात, या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
इतर अनेक मागण्याही रेल्वे प्रवासी संघटनांनी केल्या असून, याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी २२ ऑगस्ट रोजी रेल्वे प्रवासी संघटनांनी निषेध आंदोलन हाती घेत त्या दिवशी रेल्वे प्रवाशांनी पांढरे कपडे घालून लोकलने प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.
कल्याणपासून कसारा आणि कर्जतपर्यंत १२ डब्यांऐवजी १५ डब्यांच्या लोकल चालविण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याची आवश्यकता आहे. आता यासाठीच वेगवेगळ्या स्थानकांचा सर्व्हे करण्यात येणार आहे.
- डॉ. स्वप्निल नीला,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
... तर गर्दी कमी होईल / रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे
टिटवाळा आणि बदलापूरहून १५ डब्यांच्या लोकल सोडण्यात याव्यात.
एसी लोकलचे भाडे कमी करण्यात यावे.
कळवा व मुंब्रा स्टेशनमध्ये सकाळ-संध्याकाळ काही जलद लोकलना थांबा मिळावा.
सकाळ / संध्याकाळच्या वेळात ठाणे-डोंबिवलीदरम्यान लोकलच्या जास्तीत जास्त शटल फेऱ्या चालवा.
बदलापूर / अंबरनाथ / टिटवाळा ते ठाणे (कल्याण-ठाणेदरम्यान तिसऱ्या काॅरिडाॅरवरून जलद) लोकल फेऱ्या चालवा.