ॲप आधारित कॅब चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 07:02 IST2025-10-10T07:02:37+5:302025-10-10T07:02:48+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कॅब व रिक्षा चालक त्यांच्या मागण्यांसाठी विविध प्रकारे आंदोलन करीत आहेत.

ॲप आधारित कॅब चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई आणि पुण्यातील ॲप आधारित कॅब चालकांनी गुरुवारी संप पुकारल्याने दोन्ही शहरांतील प्रामुख्याने आयटी क्षेत्रासह विमानतळांवरून प्रवाशांना मोठा फटका बसला. परिणामी प्रवाशांना मीटर टॅक्सी आणि इतर पर्यायांचा वापर करावा लागला.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कॅब व रिक्षा चालक त्यांच्या मागण्यांसाठी विविध प्रकारे आंदोलन करीत आहेत. परिवहन विभागाने निश्चित केलेले दर ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या ॲप आधारित वाहतूक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या देत नसून चालकांची पिळवणूक करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यासह बाईक टॅक्सी त्वरित बंद करावी व इतर काही मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
गुरुवारी ९० टक्क्यांपेक्षा जास्त कॅब चालकांनी उत्स्फूर्तपणे त्यांची वाहने बंद ठेवली. अनेक ठिकाणी रिक्षा चालकांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या सर्व शहरांमध्ये चालकांनी बंद पाळला असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
चालकांचेही नुकसान
मुंबई व पुणे विमानतळावर बंदमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन अनेकांना वाहने उपलब्ध न झाल्यामुळे विमानतळ परिसरात थांबावे लागले. याचा सर्वांत जास्त फटका कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला.
तसेच चालकांचे दोन ते तीन हजार रुपयांचे नुकसान झाले असले तरी आमच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही तो सहन केल्याचे चालकांनी सांगितले.