ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 20:56 IST2025-08-29T20:44:29+5:302025-08-29T20:56:29+5:30
ऐन गणेशोत्सवात या स्टेशनवर लोकल उपलब्ध होणार नसल्याने गणेशभक्तांचा खोळंबा होणार आहे.

ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत मस्जिद बंदर, सँड हर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्टेशनवर लोकल उपलब्ध नसणार आहे. ऐन गणेशोत्सवात या स्टेशनवर लोकल उपलब्ध होणार नसल्याने गणेशभक्तांचा खोळंबा होणार आहे.
लालबाग, परळ, चिंचपोकळी भागात सुट्टीच्या दिवशी गणपती मंडळांना भेट देण्यासाठी लाखो गणेशभक्त मुंबई बाहेरून येतात. लालबागला पोहचण्यासाठी त्यांना मध्य रेल्वेचे चिंचपोकळी आणि करीरोड ही महत्वाची स्थानके आहेत. गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतरचा पहिल्याच रविवार असल्याने ब्लॉकमुळे या स्टेशनवर लोकल थांबणार नाहीत. परिणामी गणेशभक्तांचा खोळंबा होणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - विद्या विहार दरम्यान सर्व सेवा जलद मार्गावर वळवल्या जातील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील.
कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाबलॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - वाशी/बेलापूर/पनवेल दरम्यान सेवा सकाळी १०.१७ ते दुपारी ४.४७ पर्यंत रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी मुंबई - कुर्ला - सीएसएमटी मुंबई आणि पनवेल - वाशी - पनवेल विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.