एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 05:43 IST2025-07-01T05:40:53+5:302025-07-01T05:43:42+5:30
ही योजना दिवाळी व उन्हाळी सुटीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे.

एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट मिळणार आहे. ही सवलत १ जुलैपासून लागू होणार असून, १५० कि.मी. पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना ही दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुटीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे.
महामंडळाच्या ७७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार आता ती लागू करण्यात येत आहे. ही योजना साधी लालपरी, ई-शिवाई आणि शिवनेरी, सेमी लक्झरी अशा सर्व प्रकारच्या बससाठी लागू असणार आहे, तसेच ती पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आरक्षण करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. जादा बससाठी ही सवलत लागू असणार नाही.