लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपनगरी लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्या उपाययोजना तोकड्या असल्याचे पश्चिम रेल्वे मुख्यालयासमोरच्या चर्चगेट स्टेशनवरील स्टॉलला लागलेल्या आगीतून स्पष्ट झाले आहे. यामध्ये कमर्शिअल विभागाच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला असून, त्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा धाक नसल्याचे त्यावरून सिद्ध होते. रेल्वेने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारावी, असा आरोप रेल यात्री परिषदेने केला.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटनांना रेल्वे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याची टीका रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांवर अग्निशामक यंत्रणा नसल्याने प्रवाशांना धोका आहे. रेल्वे दुकानांची फायर सेफ्टी तपासणी करीत नाही. तसेच गुरुवारी घडलेल्या घटनेमध्ये पश्चिम रेल्वेचे अधिकारी सर्व खापर आयआरसीटीसीवर फोडत आहे. तर आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटना रेल्वेच्या हद्दीत घडली आहे. त्यामुळे एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारावी, असे रेल यात्री परिषदेने म्हटले आहे.
पश्चिम रेल्वे मुख्यालयाच्या जीएम कार्यालयातील निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. लाखो रेल्वे प्रवाशांच्या जिवाशी खेळून स्थानकांचे व्यापारीकरण केल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे रेल्वेने आयआरसीटीसीचे कंत्राट रद्द करावे. -सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांवर फायर सेफ्टीची उपकरणे नाहीत. अशात बोरिवली किंवा अंधेरीसारख्या स्थानकातील डेकवरच्या दुकानाला आग लागल्यास फायर इंजिन तिथपर्यंत कसे पोहोचणार? त्यासाठी रेल्वेने स्वतःची यंत्रणा सक्षम करावी. -राजेश पंड्या, उपाध्यक्ष, पश्चिम रेल्वे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ