ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्मवरून घसरला, RPF कॉन्स्टेबलने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 09:06 IST2025-06-02T09:05:50+5:302025-06-02T09:06:41+5:30
प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या पोकळीतून खाली घसरला होता प्रवासी

ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्मवरून घसरला, RPF कॉन्स्टेबलने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ट्रेनमध्ये चढताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या पोकळीतून खाली घसरलेल्या प्रवाशाला मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाचे (आरपीएफ) कॉन्स्टेबल राम नारायण सिंह यांनी प्रसंगावधान राखत वाचवले. ही घटना शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे घडली.
एलटीटी येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून सुटणाऱ्या एलटीटी-कोचुवेली गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एका प्रवाशाचा पाय प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या पोकळीत घसरला. प्लॅटफॉर्मवर तैनात असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल सिंह यांनी ही बाब पाहिली. यावेळी प्रसंगावधान दाखवत त्यांनी तातडीने धाव घेत त्याला मागे खेचले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. हा प्रवासी घाबरलेला होता. काही कौटुंबिक कारणामुळे त्याला तातडीने घरी जाणे गरजेचे होते. त्यामुळे ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला. या प्रवाशाचे समुपदेशन करून सुरक्षितपणे प्रवास करण्याबाबत त्याला मार्गदर्शन केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.