मुंबई - गेट ऑफ इंडियाजवळ समुद्रात प्रवासी बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नेव्हीच्या स्पीड बोटीने एलिफेंटाला जाणाऱ्या नीलकमळ नावाच्या फेरी बोटीला जोरदार टक्कर दिली. या घटनेत ११५ लोकांना रेस्क्यू करण्यात आलं असून अजूनही काही बेपत्ता आहेत. बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत नेव्हीच्या बोटीत असणारे ३ प्रवाशीही मृत्यूमुखी पडलेत. पोलीस पथक आणि नौदलाच्या टीमने प्रवाशांना वाचवण्याचं काम केले.
या दुर्घटनाग्रस्त बोटीतून उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील गौतम गुप्ता त्याच्या कुटुंबासह प्रवास करत होता. त्याने सांगितले की, मी मावशी आणि बहिणीसोबत एलिफेंटा फिरायला जात होतो. या दुर्घटनेत माझ्या मावशीचा मृत्यू झाला. बोटीत कुणाकडेही सेफ्टी जॅकेट नव्हते. दुर्घटनेवेळी आम्ही अनेकांना पाणीतून ओढून बोटीजवळ आणलं. जवळपास २०-२५ मिनिटानंतर नौदलाच्या पथकाने आम्हाला रेस्क्यू केले परंतु तोपर्यंत मी माझ्या मावशीला गमावलं असं त्याने म्हटलं.
तर राजस्थानच्या जालौर येथे राहणाऱ्या श्रवण कुमारने या अपघाताचा व्हिडिओ बनवला होता. नेव्हीची स्पीड बोट समुद्रात स्टंट करत होती. त्यामुळे आम्ही हे पाहून आश्चर्य वाटले त्यामुळे मोबाईलमध्ये व्हिडिओ सुरू केला. काही मिनिटात त्या स्पीड बोटीने आमच्या फेरी बोटला टक्कर दिली असं त्याने सांगितले. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर मी दुपारी ३.३० वाजता बोटीत चढलो होतो. नेव्हीची स्पीड बोट अरबी समुद्रात चक्कर मारत होती. त्यांच्या बोटीचा स्पीड पाहिला तर ते आपल्या बोटीला धडकतील असं वाटत होते. शेवटी तेच झाले असं प्रवाशी गणेश यांनी सांगितले. हैदराबादला राहणारा गणेश त्याला सर्वात आधी बचाव पथकाने रेस्क्यू केले होते.
दरम्यान, या प्रवासी बोटीवर लहान मुलांसह १०० हून अधिक प्रवासी होते. दुपारी ३.३० च्या सुमारास तिकीट खरेदी केल्यानंतर मी बोटीत गेलो आणि तिथून डेकवर उभा राहिलो. नीलकलम नावाची बोट गेट ऑफ इंडियापासून ८ ते १० किमी दूर पोहचली होती. तेव्हा एक स्पीड बोट तिथे वेगाने चक्कर मारत होती. ही स्पीड बोट जशी आमच्या बोटीला धडकली त्यामुळे समुद्राचं पाणी जहाजात भरायला सुरू झाले. त्यानंतर बोटीतील कर्मचाऱ्याने प्रवाशांना लाईफ जॅकेट घालण्यास सांगितले असं गणेश यांनी माहिती दिली.