Join us  

Raj Thackeray : 10 वी अन् 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करा, राज ठाकरेंनी सांगितलं 'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 12:12 PM

Raj Thackeray : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या (SSC HSC Exam 2021) परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देराज्यातील शाळा बंद आहेत, पण शाळांकडून फी आकारणी सुरूच आहे. एक तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेलंय. आता दहावी बारावीच्या परीक्षा होत आहेत, पण या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करायला हवं.

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे. त्यामुळे, पहिली ते आठवीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी परीक्षेशिवायच पास होऊन पुढील वर्गात गेले आहेत. मात्र, सरकारने राज्यात कडक निर्बंध लावल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांनाही पडला आहे. त्यातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा ने घेता पास करण्याचे सूचवले आहे. 

महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या (SSC HSC Exam 2021) परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा शिवसेनेच्या वतीने लोकसभेतही मांडण्यात आला असून, एप्रिल महिन्या ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करावी, अशी मागणी शिवसेनेकडून लोकसभेत करण्यात आली आहे. (shiv sena mp demands in lok sabha that 10th and 12th student should get corona vaccine) . मात्र, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं वर्ष पूर्ण वाया गेलंय. त्यामुळे, यंदाच्या वर्षी या सर्व विद्यार्थ्यांना पास करुन पुढील वर्गात प्रवेश द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना झूम मिटींगमध्ये केल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं. 

राज्यातील शाळा बंद आहेत, पण शाळांकडून फी आकारणी सुरूच आहे. एक तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेलंय. आता दहावी बारावीच्या परीक्षा होत आहेत, पण या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करायला हवं. कारण, ते कोणत्या मानसिकतेत असतील हे सांगता येत नाही, ते लहान आहेत. त्यांच्या मानसिकतेचा विचार व्हायरला हवा. पहिल्यांदाच आपल्यावर हा प्रसंग ओढवलाय. त्यामुळे, मी राज्य सरकारला विनंती करत आहे की, खालच्या विद्यार्थ्यांना जसं प्रमोट केलंय, तसं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढे ढकलावं, असे राज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. 

दहावीसाठी 13 लाख विद्यार्थी

यावर्षी राज्यातून दहावीसाठी १३ लाख तर १२ वीसाठी १६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. याशिवाय आयसीएसइ आणि आयएससी परिक्षेसाठीही अनुक्रमे १२ हजार आणि २३ हजार विद्यार्थी बसणार आहेत. तसेच सीबीएससीच्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करावे, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे.

1 ली ते 8 वी परीक्षेविनाच पास

विद्यार्थ्यांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठीही आपण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, पहिली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक मुल्यमापन संदर्भात महत्वाचा निर्णय घेत असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. देशातील मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत (RTE) या विद्यार्थ्यांचं वार्षिक मुल्यमापन करणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा ते शक्य नाही. त्यामुळेच, पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. तसेच, इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठीचाही निर्णय लवकरच जाहीर करू, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

दहावी-बारावीची परीक्षा तारीख निश्चित

दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे तर बारावीची २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होईल. या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा विचार आम्ही केला होता. मात्र राज्‍याची भौगोलिक परिस्‍थिती तसेच नेटवर्कची परिस्थिती लक्षात घेता परीक्षा ऑफलाइन घेण्याचे ठरले आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या त्‍याच शाळेत अथवा कनिष्‍ठ महाविद्यालयांत या परीक्षा घेण्यात येतील. अपवादात्‍मक परिस्‍थितीत वर्ग खोल्‍या कमी पडल्‍यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रात परीक्षा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :राज ठाकरेदहावी12वी परीक्षाविद्यार्थी