Dongri Building Collapses :मुंबईतील डोंगरी भागात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. ही इमारत यापूर्वीच असुरक्षित घोषित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची दुरुस्ती करण्यात येणार होती मात्र त्यापूर्वीच मध्यरात्रीनंतर त्याचा काही भाग कोसळला. यामुळे मात्र डोंगरी परिसरात खबराट निर्माण झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली कोणी दबल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. इमारत आधीच रिकामी असल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. खबरदारीचा म्हणून शोध घेतला जात आहे.
या घटनेनंतर स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि घटनेची माहिती घेतली. "नूर व्हिला नावाची ही इमारत आहे. त्यात आधीपासूनच खूप तडे गेले होते. इमारतीच्या बांधकामासाठी निधीची व्यवस्था केली जात होती. पण दुरुस्तीचे काम झाले नाही आणि आज ही इमारत कोसळली. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई महापालिका अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दल ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत," अशी माहिती अमीन पटेल यांनी दिली.